भाजपचा महापौर मुंबई महानगरपालिकेत व्हावा असे वाटते. त्यामुळे पक्षबांधणीचे काम सुरू झाले आहे. भाजप-शिवसेना युती मुंबई महानगरपालिकेत व्हावी किंवा नको हे पक्षाच्या बैठकीत ठरेल. अद्यापि स्वबळाचा निर्णय घेण्यात आलेला नाही, असे स्पष्ट मत मुंबई-भाजप अध्यक्ष आमदार आशीष शेलार यांनी व्यक्त केले. कलंबिस्त येथील शाळेच्या समारंभासाठी आलेल्या आ. आशीष शेलार यांनी पत्रकारांशी बोलताना भाजपची भूमिका स्पष्ट केली. या वेळी भाजप तालुका अध्यक्ष मनोज नाईक, अन्नपूर्णा कोरगावकर, शैलेश तावडे, सुनील राऊळ, अमित परब आदी उपस्थित होते. मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत अद्यापि भाजपचे धोरण निश्चित झालेले नाही, मात्र मुंबईत भाजप पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी जोरात प्रयत्न सुरू आहे. भाजपचा महापौर व्हावा, असे भाजपला वाटते आहे. प्रत्येक पक्षाला तसे वाटणारच म्हणजे युती होणारच नाही, असे म्हणता येणार नाही असे त्यांनी सांगितले. केंद्र व राज्यात भाजप सेना युती आहे असे ते म्हणाले. केंद्र व राज्य सरकारकडून जनतेच्या अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी दोन्ही सरकारचा प्रयत्न आहे. एक वर्षांच्या सत्तेच्या काळात मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न मार्गी लागत आहे. तसेच अन्य रखडलेले प्रश्नदेखील सुटतील असा विश्वास आ. शेलार यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जनतेच्या प्रश्नावर सकारात्मक आहेत. अनेक निर्णय घेतले त्यांची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरू झाल्यावर विकासपर्वाचे रूप दिसेल. तरुणांना खासगी उद्योगातून नोकऱ्या, रोजगार मिळावा म्हणून दोन्ही सरकारचे निर्णय झालेले आहेत. कोकणातील रिफायनरीतून एक लाख तरुणांना नोकऱ्या देण्याचा प्रकल्प एक भाग आहे. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष नोकऱ्या आणखी वाढतील असे ते म्हणाले. काँग्रेस पक्षाने पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या घरावर काढलेल्या मोर्चाबाबत आ. शेलार म्हणाले, राणे यांनी आयुष्यभर राजकारण केले तेच आज आंदोलन व्यक्तिगत आकसापोटी हिशेब चुकते करण्यासाठी करीत आहेत. असे उद्योग राणे परिवाराने करू नयेत, लोकांना ते आवडणार नाही. आंदोलने करण्याचा अधिकार सर्वाना आहे, पण व्यक्तिगत आकसापोटी आंदोलनाला जनता नाकारेल असे आ. शेलार म्हणाले. जिल्हा नियोजन मंडळाने रोजगार निर्माण करून दरडोई उत्पन्न कसे वाढेल, त्यासाठी नियोजन करायला हवे, त्यानंतर राज्य सरकार निधी देईल. त्यासाठी पुढील काळात प्रयत्न करू, असे शेलार यांनी सांगितले. स्थानिकांना रोजगाराचे धोरणही त्यातूनच ठरेल, असेही आ. शेलार म्हणाले. भाजप सर्वाना उद्योग-व्यवसायातून रोजगार, नोकऱ्या निर्माण व्हाव्यात म्हणून निश्चित प्रयत्न करील, अशी ग्वाही आ. शेलार यांनी दिली. दरम्यान, वेंगुर्ले नगराध्यक्ष प्रसन्ना कुबल यांनी आ. शेलार यांची भेट घेऊन वेंगुर्ले पर्यटन महोत्सवाचे निमंत्रण दिले. या वेळी स्नेहा कुबल व मान्यवर उपस्थित होते.