मुंबई पोलिसाची सरकारी बंदूक आणि ३० जिवंत काडतूसांची चोरी करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखा आणि पश्चिम देवपूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडून बंदूक आणि काडतूस हस्तगत करण्यात आले आहेत. दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. चेतन कोळी हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. त्यांच्या वडिलांची प्रकृति बिघडल्याने ते १० सप्टेंबर रोजी सरकारी बंदूक आणि ३० जिवंत काडतूस मुख्यालयात जमा न करताच धुळे शहरात घरी आले होते. कोळी यांनी त्यांची पिशवी झेंडा चौकातील किरण सोसायटीत राहणाऱ्या बहिणीच्या घरी ठेवली होती. काही दिवसांनी कोळी यांनी त्यांची पिशवी तपासली असता त्यातील बंदूक, ३० जिवंत काडतूस, मंगळसूत्र आणि रोकड असा एक लाख, ७६ हजार रूपयांचा ऐवज चोरीस गेल्याचे दिसले. या प्रकरणी कोळी यांनी पश्चिम देवपूर पोलिसांकडे तक्रोर केल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत, निरीक्षक सतीश गोराडे, उपनिरीक्षक मेाईनुद्दीन सय्यद, हवालदार रफीक पठाण, गौतम सपकाळे, मुक्तार शेख, अमोल रामराजे, रमाकांत पवार यांच्या पथकाने  दोघा चोरटय़ांना शोधून काढले. भरत चौधरी (रा.मनमाड जीन, धुळे) याने चोरी करुन बंदूक आणि ३० जिवंत काडतूस आमीन इकबाल अन्सारी (रा.काझी प्लॉट, वडजाईरोड, धुळे) याच्याकडे विक्रीला दिले होते. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून बंदूक आणि काडतूस ताब्यात घेण्यात आले.