26 October 2020

News Flash

मुंबईचा वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताचा कट?; ऊर्जा मंत्री राऊत यांचं खळबळजनक ट्विट

ऊर्जामंत्र्याच्या ट्विटनं अनेकांच्या भूवया उंचावल्या

महापारेषणच्या पडघा उपकेंद्रातील उच्चदाब वीज वाहिनीतील बिघाडामुळे सोमवारी मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि रायगडमधील वीजपुरवठा पूर्णपणे खंडित झाला होता. त्यामुळे रेल्वे, रस्ते वाहतुकीसह दैनंदिन व्यवहारांना फटका बसला, त्याचबरोबर मुंबई, ठाणे परिसरात जनजीवनही विस्कळीत झालं होतं. मात्र, वीज पुरवठा खंडित होण्यामागे राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी धक्कादायक ट्विट केलं आहे.

महापारेषणच्या ४०० के.व्ही.च्या कळवा-पडघा वीजवाहिनी क्रमांक१ची देखभाल-दुरुस्ती सुरू होती. यावेळी सर्व भार सर्किट-२ वर होता. मात्र, सर्किट-२ मध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबई, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता.

सर्किटमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं वीज गेल्याचं ऊर्जामंत्र्यांसह महापारेषणच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं होतं. मात्र, वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणात ऊर्जामंत्र्यांनी ट्विट करत नवी खळबळ उडवून दिली आहे. “सोमवार दिनांक १२.१०.२०२० रोजी मुंबई, नवी मुंबई व ठाणे येथील संपूर्ण वीज पुरवठा खंडित होण्यामागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही,” असं ट्विट ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनंतर नवा विषय चर्चेत आला आहे.

मुंबई परिसराचा वीज पुरवठा खंडित होण्याची ही गेल्या दशकभरातील चौथी मोठी घटना होती. चार ते पाच तास तीन जिल्ह्यातील वीज पुरवठा पूर्णपणे बंद होता. त्यामुळे नागरिकांना प्रचंड समस्यांना तोंड द्यावं लागलं. या घटनेची चौकशी करण्याचे आदेशही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 8:34 am

Web Title: mumbai power cut nitin raut minister tweet bmh 90
Next Stories
1 ‘वाढवण’विरोधी संघर्षांला धार
2 राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाला गती
3 कायद्याच्या अज्ञानामुळे महाविकास आघाडीचे सदस्य आक्रमक
Just Now!
X