मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील धोकादायक दरडी हटविण्याच्या कामाच्या दुसऱ्या टप्प्याला आजपासून सुरूवात होत आहे. आजपासून(दि.२१) २३ मे दरम्यान हा ब्लॉक असणार आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) एक्स्प्रेस वेवर तळेगाव टोलनाका येथून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारला जोडणाऱ्या मार्गिकेवरील उर्से खिंड येथे दरड आणि मोठे दगड हटविण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात या कामासाठी एक्स्प्रेस वेवर १४ ते १७ मे दरम्यान ब्लॉक घेण्यात आला होता.

महामंडळाने पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण केले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील कामाला सुरुवात केली असून, त्यासाठी २१ ते २३ मे या दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत दरतासाला १५ मिनिटांकरिता वाहतूक बंद करण्यात येणार आहे. यावेळी एकूण ६ ब्लॉक असणार आहेत. त्यामुळे प्रवाशांनी महामार्ग पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तो ब्लॉक पुढील प्रमाणे असेल.

वेळ – 
ब्लॉक १- १०.०० ते १०.१५, ब्लॉक २ – ११.०० ते ११.१५, ब्लॉक ३ – १२.०० ते १२.१५, ब्लॉक ४ – २.०० ते २.१५, ब्लॉक ५ – ३.०० ते ३.१५ आणि ब्लॉक ६ – ४.०० ते ४.१५ या दरम्यान १५ मिनिटांचा ब्लॉक.