मुंबई ते पुणे प्रवास करण्यासाठी रेल्वे आणि रस्त्यासोबत भविष्यात मेट्रोचाही पर्याय उपलब्ध होण्याची शक्यता आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे लगत असणाऱ्या ७१ गावांचा विकास आराखडा आखण्यात आला असून यामध्ये मेट्रो मार्गाचीही तरतूद करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भविष्यात जर संबंधित विभागाने एक्स्प्रेस-वे लगत मेट्रो मार्ग उभारण्याचा निर्णय घेतला तर त्याच्यासाठी वेगळी परवानगी घ्यावी लागणार नाही.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे लगतच्या ७१ गावांच्या विकास आऱाखड्याची जबाबदारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळावर सोपवण्यात आली आहे. एमएसआरडीसीचे सहसंचालक विजय वाघमारे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘भविष्यात मेट्रो मार्ग उभा राहू शकतो हे लक्षात घेता विकास आऱाखड्यात रस्त्यालगतचा काही भाग राखीव ठेवण्यात आला आहे. रस्ते बांधणीच्या नियोजनातच मेट्रोसाठी अतिरिक्त जागा सोडण्यात आली आहे’.

‘नवी मुंबईपर्यंत असणारे मेट्रोचे जाळे पुढे वाढवले जाऊ शकते. आरक्षित जागा पनवेलमध्ये आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानुसार, विकास आराखड्यात ७१ गावांचा समावेश असून पनवेल आणि खालापूर तालुक्यातील एकूण १८६.७२ स्क्वेअर किलोमीटर क्षेत्रफळ येतं. या भागातील एकूण लोकसंख्या जवळपास एक लाख आहे’, अशी माहिती विजय वाघमारे यांनी दिली आहे.

विकास आराखड्यानुसार, वाहतुकीचं मोठं जाळं उभं करण्याचा प्रस्ताव आहे. यासोबत रेल्वेशी जोडणारी बससेवाही सुरु करण्यात येणार आहे. परिसरात राहणाऱ्या लोकांसाठी अतंर्गत वाहतूक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे. वाहतुकीसाठी खासगी किंवा सार्वजनिक सेवेचा वापर केला जाणार आहे की नाही यासंबंधी अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.