25 August 2019

News Flash

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १० किलोमीटरचा नवीन बोगदा

टोल वसुलीचे एकनाथ शिंदेंकडून समर्थन

टोल वसुलीचे एकनाथ शिंदेंकडून समर्थन

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील अपघात आणि वाहतूक कोंडीच्या घटना टाळण्यासाठी खालापूर येथून १० किलोमीटरचा बोगदा करण्यात येणार आहे. सात हजार कोटींच्या या कामांतून अध्र्या तासाचे अंतर कमी होऊन वाहनधारकांच्या वेळ, इंधनाची बचत होईल, असे नमूद करत सार्वजनिक बांधकाममंत्री (उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी या मार्गावर नव्याने टोल वसुलीचे एकप्रकारे समर्थन केले.

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाचे टोल वसुलीचे कंत्राट ऑगस्ट २०१९ मध्ये पूर्ण होत आहे. द्रुतगती मार्गावरील टोल वसुलीची मुदत संपुष्टात येत असताना पुन्हा त्याच मार्गावर नव्याने टोल वसुलीच्या हालचाली सुरू आहेत. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने त्याबाबत जाहिरात दिली आहे. नव्याने टोल वसुलीबाबत उपस्थित झालेल्या प्रश्नावर शिंदे यांनी द्रुतगती मार्गावरील प्रस्तावित कामाची माहिती दिली. द्रुतगती मार्गाची उभारणी झाल्यामुळे विकासाला गती मिळाली. मार्गावरील काही विशिष्ट भाग अपघातप्रवण असून तिथे वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. यावर तोडगा म्हणून १० किलोमीटरचा बोगदा प्रस्तावित आहे. त्यामुळे अध्र्या तासाचे अंतर कमी होईल. उपरोक्त समस्या संपुष्टात येतील. वाहनधारकांना सुविधा मिळणार असून मुंबई-पुणे दरम्यानचा प्रवास अधिक जलद, सुकर होईल. शिवसेना-भाजप सरकारच्या काळात राज्यातील ५३ टोल नाके बंद करण्यात आल्याचे शिंदे यांनी सांगितले.

‘मुख्यमंत्री पदाबाबत इतरांना बोलण्याचा अधिकार नाही’

राज्याच्या पुढील मुख्यमंत्रीपदाबाबत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. त्याबद्दल बोलण्याचा कोणालाही अधिकार नाही. वरिष्ठ नेत्यांकडून जो निर्णय होईल, त्याची अंमलबजावणी करण्याचे काम आमचे असल्याचे सांगत शिंदे यांनी मुख्यमंत्रीपद कोणाला मिळणार यावर बोलणे टाळले. आदित्य ठाकरेंच्या जन आशीर्वाद यात्रेला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. लोकसभा निवडणुकीत सेनेला मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानण्यासाठी ही यात्रा असून त्यामागे विधानसभा निवडणूक प्रचाराचा उद्देश नसल्याचा दावा त्यांनी केला. औरंगाबादमध्ये मुस्लिम युवकाला मारहाणीचा प्रकार निंदनीय आहे. त्याची चौकशी करून कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले.

First Published on July 21, 2019 12:51 am

Web Title: mumbai pune expressway mpg 94