News Flash

‘जेएनयू’मधील हल्ल्याचे पडसाद मुंबई-पुण्यात, मध्यरात्री विद्यार्थ्यांची निदर्शने

विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात उमटू लागले आहेत.

दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्याचे पडसाद मुंबई, पुण्यासह देशाच्या विविध भागात उमटू लागले आहेत. हल्ल्याच्या निषेधार्थ मध्यरात्री मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे विद्यार्थ्यांनी कँडल मार्च काढला. यामध्ये विद्यार्थी नेता उमर खलिदही सहभागी झाला होता. तसेच मुंबई आयआयटीमध्येही विद्यार्थ्यांनी निशेध नोंदवला आहे. तर पुण्यातही एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी निदर्शने करत आपला संताप व्यक्त केला.

(एफटीआयआयच्या विद्यार्थीचे प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन)

पुण्यात मध्यरात्रीच्या सुमारास एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत जेएनयूतील हल्ल्याचा तीव्र निदर्शने केली. यावेळी अभाविपच्या विरुद्ध निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. मुंबईत गेट वे ऑफ इंडिया येथे मध्यरात्री मोठ्या प्रमाणात विद्यार्थी एकवटले. कँडल मार्च काढत विद्यार्थ्यांनी आपला निषेध नोंदवला.

परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर , केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, शरद पवार, आनंद महिंद्रा आणि आदित्य ठाकरे यांनी ट्विटरवरून जेएनयूतील घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हिंसाचाराची जी दृष्ये समोर आली आहेत ती भीतीदायक आहेत. विद्यार्थ्यांसाठी हे ठिकाण अधिक सुरक्षित असण्याची गरज आहे, असे सीतारामन यांनी नमूद केले. राजकारण, विचारधारा कोणतीही असो, जर तुम्ही भारतीय असाल तर अशाप्रकारची गुंडगिरी खपवून घेता कामा नये. हल्ला करणाऱ्यांना शोधून काढून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी महिंद्रा यांनी केली.

दरम्यान, जेएनयूवरील हल्ल्याच्या निषेधार्थ आज, सोमवारी मुंबईतील विविध संघटना निदर्शने करणार आहेत. हुतात्मा चौक येथे सायंकाळी ४ वाजता छात्र भारती, जॅक मुंबई आणि सर्व पुरोगामी संघटना आंदोलन करणार आहेत. तसेच न्या. बी. जी. कोळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात आज सायंकाळी सात वाजता गुडलक चौकात निषेध सभा होणार आहेत.

चेहरे झाकलेल्या लाठय़ा-काठय़ाधारी हल्लेखोरांनी रविवारी रात्री जेएनयूच्या साबरमती हॉस्टलमध्ये घुसून विद्यार्थांवर प्राणघातक हल्ला केला. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांसह प्राध्यापकही जखमी झाले. विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आयेषी घोष गंभीर यामध्ये जखमी झाली. या प्रकरणी गृहमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले. या हल्ल्यात विद्यार्थी आणि प्राध्यापकांसह किमान १८जण जखमी झाले आहेत. त्यांना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यामागे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा (अभाविप) हात असल्याचा आरोप जेएनयू विद्यार्थी संघटनेने केला आहे. ‘अभाविप’ने मात्र त्याचा इन्कार केला आहे.

पोलिसांचे वर्तन संशयास्पद
जेएनयूच्या आवारात हल्लेखोरांचा उच्छाद सुरू असताना पोलिसांचे वर्तन संशयास्पद असल्याचे म्हटले जाते. जेएनयूच्या आवारात हल्लेखोरांना मोकाट सोडले गेल्याचेही सांगितले जात आहे. शिक्षकांना मारहाण झाली ही अफवा नसून प्रत्यक्ष घटना असल्याचे ट्विट या आवारातच राहणारे ज्येष्ठ पत्रकार आणि शिक्षक संजय बारू यांनी केले. हिंसाचारावेळी जेएनयूचे कुलगुरू आवारात नव्हते. रात्री १०.२२ मिनिटांनी केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाने ट्विट करून पहिली प्रतिक्रिया दिली आणि शांतता राखण्याचे आवाहन केले. जेएनयूमधील घटना दुर्दैवी असून अराजक सहन केले जाणार नाही, असे त्यात म्हटले आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 7:40 am

Web Title: mumbai pune students protest against violence in delhi jnu nck 90
Next Stories
1 आता वाघाची शेळी झाली
2 कीर्तन महोत्सवात ८३६ मुलींचा नामकरण सोहळा; आंतरराष्ट्रीय नोंद
3 तर मंत्रालयाबाहेर खुर्ची टाकून बसणार
Just Now!
X