मुंबईहून कोल्हापूरला जाणारी महालक्ष्मी एक्स्प्रेस शुक्रवारी रात्रीपासून वांगणी जवळ अडकली आहे. पावसाचे पाणी रुळांवर मोठ्या प्रमाणावर साठल्याने ही एक्स्प्रेस पुढे जाऊच शकलेली नाही. या एक्स्प्रेसमध्ये तब्बल 700 प्रवासी अडकल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतर त्वरित बचावकार्य सुरू करण्यात आले. दरम्यान, राज्य सरकारच्या विनंतीनंतर एनडीआरएफसह नौदलाचे आणि हवाईदलाचे चॉपर्सही बचावकार्यात सामिल झाले आहेत. दरम्यान, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या 9 गर्भवती महिलांची सुटका करण्यात यश आले आहे. त्यामधील एका महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्याची माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, या ट्रेनमध्ये अडकलेल्या 700 जणांपैकी 500 जणांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यामध्ये 9 गर्भवती महिलांचाही समावेश होता. त्या सर्व महिलांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यादरम्यान, एका महिलेला प्रसुतीकळा सुरू झाल्याची माहिती समोर आली होती. तसेच त्या महिलेच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी मागणी केली होती. त्यानंतर त्यांना त्वरित मदत देत सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. दरम्यान, महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बदलापूर स्थानकापर्यंत नेण्यात येणार असून त्यांच्यासाठी जेवणाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.

रेल्वेत अडकलेल्या प्रवाशांच्या बचावकार्यासाठी ग्रामस्थही पुढे सरसावल्याचे पहायला मिळाले. तसेच सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, सुटका करण्यात आलेल्या प्रवाशांची सह्याद्री मंगल कार्यालयात जेवणाची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. तसेच 37 डॉक्टरांची टीमही वांगणीत दाखल झाली आहे.