मुंबई- पुणे मार्गावरील रेल्वे प्रवाशांना आज (मंगळवारी) आणि उद्या (बुधवारी) अडचणींचा सामना करावा लागणार आहे. मंगळवारी संध्याकाळी पुण्यातून सुटणारी पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस, पुणे – मुंबई डेक्कन एक्स्प्रेस तर बुधवारी सकाळी मुंबईतून पुण्याला जाणारी मुंबई- पुणे डेक्कन आणि मुंबई – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय पुणे – कर्जत – पुणे पॅसेंजर ट्रेनही रद्द करण्यात आली आहे.

मुसळधार पावसामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले असून सायन स्थानकाजवळ पाणी साचले आहे. याचा फटका लोकल गाड्यांसह लांब पल्ल्याच्या एक्स्प्रेस गाड्यांनाही बसला आहे. मध्य रेल्वेने मंगळवारी दुपारी ट्विटरवरुन मुंबई पुणे मार्गावरील एक्स्प्रेस गाड्यांबाबत माहिती दिली.

रद्द करण्यात आलेल्या गाड्या
१० जुलै

  • २२१०६ पुणे – मुंबई इंद्रायणी एक्स्प्रेस
  • ११००८ पुणे – मुंबई डेक्कन एक्स्प्रेस

११ जुलै

  • ११००७ मुंबई – पुणे डेक्कन एक्स्प्रेस
  • २२१०५ मुंबई – पुणे इंद्रायणी एक्स्प्रेस
  • ५१३१७/५१३१८ पुणे – कर्जत – पुणे पॅसेंजर ट्रेन (१० व ११ जुलै)

या गाड्यांचे मार्ग बदलले

१० जुलै

  • ११०२६ पुणे- भुसावळ एक्स्प्रेस ही एक्स्प्रेस दौंड – मनमाड मार्गावरुन जाईल

११ जुलै

  • ११०२५/ ११०२६ भुसावळ – पुणे- भुसावळ एक्स्प्रेस दौंड – मनमाड मार्गावरुन जाईल

पश्चिम रेल्वेवर वसई – विरार दरम्यान रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने या मार्गावरील लांब पल्ल्यांच्या गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले आहे. पश्चिम रेल्वेने ट्विटरवरुन मार्ग बदललेल्या आणि रद्द झालेल्या गाड्यांची माहिती दिली आहे.

पश्चिम रेल्वेने पावसामुळे खोळंबलेल्या एक्स्प्रेस गाड्यांमधील प्रवाशांसाठी पाणी व नाश्त्याची सोय केली आहे.

पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक ए के गुप्ता यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला. वसई- विरार मार्गावरील सेवा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु असल्याचे पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले.