राहुल गांधींपाठोपाठ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीदेखील ‘विकासा’वरुन भाजपवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी बुलेट ट्रेनचे स्वप्न बघत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समृद्धी महामार्गाचे स्वप्न बघत आहेत. पण आमच्या माता भगिनींची झोप उडवून तुम्ही स्वप्न रंगवतायं. देशाला वेडा झालेला ‘विकास’ परवडेल का असा खोचक प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरेंनी भाजपवर हल्लाबोल केला.

राज्यातील अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने मानधनवाढ व पोषण आहारशुल्क मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु केले आहे. बुधवारी या आंदोलनात सहभागी होत उद्धव ठाकरे अंगणवाडी सेविकांना पाठिंबा दर्शवला. या आंदोलनात संबोधित करताना उद्धव ठाकरेंनी भाजपवर तोंडसूख घेतले. आम्ही सत्तेत असलो तरी आमचे मन मेलेले नाही. मी आंदोलन बळकवायला आलेलो नाही. मी या आंदोलनाला ताकद देण्यासाठी आलो आहे, असे त्यांनी सांगितले.

देशाचे पंतप्रधान बुलेट ट्रेनचे स्वप्न बघतात, मुख्यमंत्री समृद्धी महामार्गाचे स्वप्न बघतात. स्वप्न बघण्यात गैर काही नाही. पण आमच्या माता-भगिनींची झोप उडवून तुम्ही स्वप्न बघत आहात. अंगणवाडी सेविकांनी चुलीवर काय शिजवायचं हे आधी सांगा, असे त्यांनी सांगितले.
मी कुपोषणग्रस्त भागात गेलो असून या भागात अंगणवाडी सेविकांनी मोलाचे काम केले आहे. या सेविका म्हणजे माताच आहेत. महाराष्ट्रात शिवाजी महाराजांचे नाव घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही हे भाजपच्या लक्षात आले. आता भाजपही शिवाजी महाराजांचे नाव घेते. पण महाराजांचे नाव घेता, मग ते मातृभक्त होते हे कसे विसरलात. तुम्ही या मातांचे श्राप घेत असून हे श्राप तुम्हाला भोवणार असे ठाकरे म्हणालेत.

सरकारने अंगणवाडी सेविकांचे संप चिरडण्याचे ठरवले आहे. पण शिवसेना तुमच्या पाठिशी आहे. महागाई वाढली, पण अंगणवाडी सेविकांचे मानधन वाढले नाही. दुर्दैवाने हे सरकार फक्त करच गोळा करत आहे अशी टीका त्यांनी केला. लोकशाहीच्या नावाने ठोकशाही होत असेल तर ते दांडके मोडून टाकू, दडपशाही चालणार नाही असा इशाराही त्यांनी राज्यातील सत्ताधारी भाजपला दिला. आंदोलन करणाऱ्या माता-भगिनींकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे.  या महिलाच सौभाग्य आहेत. फक्त वीज जोडले म्हणजे सौभाग्य होत नाही. जोडलेल्या माणसांना जपा असा टोला त्यांनी सरकारला लगावला.