गणेशोत्सव हा धूमधडाक्यात साजरा केला पाहिजे. ज्यांना गणेशोत्सव आवडत नसेल त्यांनी खुशाल स्मशानात जाऊन बसावे, असे विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत केले. ध्वनी प्रदुषणाविरोधात न्यायालयात याचिका दाखल करुन गणेशोत्सवात विघ्न आणणाऱ्यांना मेट्रोच्या कामांमुळे होत असलेला खणखणाट ऐकून येत नाही का?, असा सवालही त्यांनी विचारला.

उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुंबईतील मरिन लाईन्स येथे गणेशोत्सव मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. सुमारे ४०० पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते. गणेशोत्सवावरुन सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे म्हणाले, विघ्नहर्त्या मंगलमूर्तीचे आगमन होण्यापूर्वीच विघ्नकर्त्या कायदे पंडिताचे सोटे वाजतात. आनंदाच्या वेळेला ही लोक काळ्या मांजरासारखे आडवे येतात. शांतता गेली स्मशानात. गणेशोत्सव हा धूमधडाक्यातच साजरा झाला पाहिजे. ज्यांना गणेशोत्सव आवडत नसेल त्यांनी खुशाल १० दिवस स्मशानात जाऊन बसावे, असे त्यांनी सांगितले.

मेट्रोसाठी शहरात खोदकाम करण्यात आले. शहरातील मैदाने खणून ठेवली असून मेट्रोच्या कामामुळे इमारतींना हादरे बसत आहे. रस्तेही अडवले गेले आहेत. गणेशोत्सवात विघ्न आणणाऱ्यांने हे दिसत नाही का?, गणेशोत्सवात रात्री दहानंतर पोलीस लाऊड स्पीकर बंद करतात आणि दुसरीकडे मेट्रोसाठी रात्री खोदकामाची परवानगी मागितली जाते. गणेशोत्सवाच्या आड याल तर खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी या प्रसंगी दिला.