सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी चाकरमानींचा ओघ आतापासूनच सुरू झाला असून खारेपाटण तपासणी नाक्यावर वाहनांच्या दोन ते तीन किलोमीटरपर्यंत रांगा लागत आहेत.

खारेपाटण तपासणी नाक्यावरील पोलिसांनी सांगितले की, शनिवारी दिवसभरात सुमारे १५० वाहनातून ८०० ते ९०० चाकरमानी दाखल झाले आहेत. या शिवाय आंबोली तपासणी नाक्यावरूनही चाकरमानी दाखल झाले.

जिल्ह्यात एक हजार चाकरमानी दाखल झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गणेशोत्सवासाठी येऊ  इच्छिणाऱ्या चाकरमानींसाठी १४ दिवस गावातील शाळा किंवा आपल्या बंद घरांमध्ये अलगिकरणात राहावे लागणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या खारेपाटण तपासणी नाक्यावर  थर्मल गन व पल्सऑक्सीमीटरच्या माध्यमातून तपासणी केली जात आहे. आज तिघेजण करोना  संशयित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे त्यांचा स्वॅब तपासणीसाठी घेण्यात आला आहे. तेथील वैद्यकीय प्रमुख डॉ. प्रीया वडम यांनी सांगितले की, या संशयित रुग्णांना गावी पाठवले असून त्यांचा तपासणी अहवाल नगरपालिका किंवा ग्रामपंचायतीला कळवण्यात येईल. त्यानंतर विलगिकरण करण्याचा निर्णय ती समिती घेईल.

दरम्यान शनिवारी नवीन १३  करोनाबाधित रूग्ण आढळले असून जिल्ह्यात आतापर्यंत ३७७ रुग्ण सापडले आहेत. त्यापैकी २८१ रुग्ण घरी परतले आहेत, तर सद्यस्थितीत ९० रुग्ण सक्रीय उपचार घेत आहेत,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर यांनी दिली.