गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाबद्दलची सहानुभूती, सहा महिन्यांपासून सत्तेत मंत्री, खासदार-आमदारांसह बहुतांशी सत्तास्थाने ताब्यात यामुळे वैद्यनाथ साखर कारखाना निवडणुकीत ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या पॅनेलचा अपेक्षेप्रमाणे विजय झाला. मात्र, सहकारी संस्थेतील मतदार बांधील असताना राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या पॅनेलच्या उमेदवारांना झालेले अडीच हजारांचे मतदान दुर्लक्षित करण्यासारखे नसून पराभवातही त्यांना राजकीय बळ देणारे मानले जाते. कारखाना स्थापनेपासून पहिल्यांदा झालेल्या निवडणुकीत विरोधी पॅनेलला मिळालेली सभासदांची ३० टक्के मते मुंडे भगिनींना विचार करायला लावणारी आहेत.
गोपीनाथ मुंडे यांनी १५ वर्षांपूर्वी वैद्यनाथ कारखान्याची उभारणी करून सहकारातील अनेक विक्रम करीत आपणही साखर उद्योग यशस्वी चालू शकतो, हे सिद्ध केले. संचालक मंडळाच्या तीन पंचवार्षिक निवडणुका बिनविरोधच झाल्या. प्रत्येक वेळी राज्यपातळीवर कट्टर राजकीय विरोधक असलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्थानिक नेत्यांना रसद पुरवून कारखान्यात आव्हान देण्याचा केलेला प्रयत्न एकदाही पूर्ण पॅनेल उभा करण्याइतकाही यशस्वी झाला नाही. मात्र, ५ वर्षांपूर्वी मुंडे कुटुंबातील गृहकलहानंतर कारखान्याचे संस्थापक संचालक ज्येष्ठ बंधू पंडितराव मुंडे व पुतणे धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणि येथूनच कौटुंबिक सत्तासंघर्ष पेटला.
दरम्यान, मागील जून महिन्यात गोपीनाथ मुंडे यांचे अपघाती निधनानंतर त्यांचा राजकीय वारसा मुलगी पंकजा मुंडे यांच्याकडे आला. त्या वेळी साखर कारखाना या वर्षी सुरू होणार का नाही? अशी स्थिती होती. कोणताही अनुभव गाठिशी नसताना आíथक अडचणींवर मात करून पंकजा मुंडे यांनी गळीत हंगाम यशस्वी केला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर संघर्ष यात्रा काढून पंकजा मुंडे यांनी राज्यभर संघटन उभे केले. त्यानंतर राष्ट्रवादीने परळी मतदारसंघातून धनंजय मुंडे यांना मदानात उतरवून बहीण-भावात लढत लावली. परंतु पंकजा मुंडे यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागली. राष्ट्रवादीने धनंजय मुंडे यांना विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद देऊन पंकजा मुंडे यांना जिल्ह्यातच प्रखर विरोध उभा केला.
गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर मुलगी पंकजा व पुतणे धनंजय या दोघांनाही प्रदेशस्तरावर एकाच वेळी संधी मिळाल्याने दोघांचाही नेतृत्व सिद्ध करण्यासाठी कस लागला. विधिमंडळात आणि बाहेर ‘मुंडे विरुद्ध मुंडे’ असा सत्तासंघर्ष तीव्र असतानाच वैद्यनाथ कारखाना निवडणुकीत दोघांनीही प्रतिष्ठा पणाला लावली. मात्र, कर्ज प्रकरणामुळे धनंजय व त्यांचे वडील पंडितराव मुंडे यांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे निवडणुकीत पंकजा मुंडेंचा एकतर्फी विजय होणार, असे चित्र निर्माण झाले. मुंडे पिता-पुत्रांनी स्वत: मदानात नसतानाही पॅनेल सक्षमपणे उभे करून मतदारसंघ िपजून काढत आव्हान दिले. पंकजा मुंडे यांच्यासह खासदार डॉ. प्रीतम मुंडे व अॅड. यशश्री मुंडे या भगिनींनी तळ ठोकला.
जिल्ह्यातील भाजप आमदार, पदाधिकाऱ्यांची फौजही मदानात उतरल्याने निवडणुकीकडे राज्याचे लक्ष वेधले. अखेर ७ हजार मतांपकी पंकजा मुंडे यांच्या पॅनेलला ४ हजार २५२, तर धनंजय मुंडे यांच्या पॅनेलला २ हजार ४०० मते मिळाली. अडीच हजार मतांच्या फरकाने विजय मिळवीत मुंडे भगिनींनी भावाला चीतपट करून वर्चस्व कायम ठेवले. मात्र, धनंजय मुंडे यांच्या बाजूने जिल्ह्यातील राष्ट्रवादीचाही कोणीही नेता मदानात उतरला नाही. धनंजय मुंडे यांनी एकाकी लढत देत कारखाना निवडणुकीत स्वत: उमेदवार नसताना आपल्या पॅनेलच्या उमेदवारांना अडीच हजारांची मते घेतली. सहकारी संस्थेत सभासद मतदार हे बांधील मानले जातात. स्थापनेपासून या कारखान्यात १५ वर्षांत विरोधकांना पूर्ण पॅनेलही उभे करता आले नाही, तेथे धनंजय मुंडे यांनी घेतलेली मते दुर्लक्षित करण्यासारखी नसल्याचे मानले जाते.
मुंडे पिता-पुत्र उमेदवार नसल्याने पंकजा मुंडे यांच्या पॅनेलचा एकतर्फी विजय होईल व विरोधी पॅनेलच्या उमेदवारांची अनामत रक्कमही वाचणार नाही, असे चित्र असताना विरोधी पॅनेलला मिळालेली मते विजय मिळाल्यानंतर मुंडे भगिनींना विचार करायला लावणारी ठरली. गृहकलहानंतर राष्ट्रवादीच्या आश्रयाला गेल्याने प्रत्येक निवडणुकीत सपाटून पराभव पत्कारावा लागणाऱ्या धनंजय मुंडे यांच्यासाठी ‘वैद्यनाथ’ निवडणुकीतील मते त्यांना राजकीय बळ देणारी असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.