वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या २० जागांसाठी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखालील दोन पॅनेलचे एकूण ४० उमेदवार िरगणात राहिले आहेत. दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी उभारलेल्या ‘वैद्यनाथ’च्या निवडणुकीत प्रथमच विरोधात पॅनेल निर्माण झाले आहे. कारखान्याची सत्ता ताब्यात ठेवण्यासाठी मुंडे कुटुंबातील बहीण-भावातील संघर्ष सुरू झाला आहे.
परळी तालुक्यातील पांगरी येथे १५ वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे यांनी या कारखान्याची उभारणी केली. वर्षभरात कारखान्याचा गळीत हंगाम करून सहकारातील अनेक विक्रम कारखान्याने निर्माण केले. स्थापनेपासून १५ वर्षांत या कारखान्याची कधीच निवडणूक झाली नाही. एक वेळ काँग्रेस-राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी पॅनेल उभारण्याचा केलेला प्रयत्नही सपशेल फसला होता, मात्र मुंडे कुटुंबातील फाटाफुटीनंतर कारखान्याचे संस्थापक संचालक पंडितराव मुंडे व धनंजय मुंडे हे पिता-पुत्र राष्ट्रवादीत गेल्याने या वेळी पहिल्यांदा विरोधी पॅनेल निर्माण झाले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या वारस भाजप नेत्या व मंत्री पंकजा मुंडे, तसेच यशश्री मुंडे या दोघी बहिणींसह आमदार आर. टी. देशमुख, भाजप प्रदेश उपाध्यक्ष फुलचंद कराड संचालकपदासाठी उमेदवार आहेत. राष्ट्रवादीचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे व त्यांचे वडील पंडितराव मुंडे यांचे उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानंतरही त्यांनी पूर्ण जागांसाठी उमेदवार उभे करून आव्हान दिले. मागील दोन दिवसांपासून पंकजा मुंडे व धनंजय मुंडे परळीत तळ ठोकून आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी २० जागांसाठी मदानात दोन्ही पॅनेलचे ४० उमेदवार आहेत. त्यामुळे दि. २६ला होणाऱ्या मतदानात सभासद कोणाला साथ देतात, याकडे लक्ष लागले आहे.