दुष्काळी मेळाव्याचे निमित्त करून भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी लातूर जिल्हय़ातील मुरूड येथून लोकसभा व विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले. अर्थात, त्यांचे सैन्य किती एकजुटीने साथ करते, त्यावरच युद्धातील जय-पराजय अवलंबून आहे.
मराठवाडय़ावर या वेळी दुष्काळाचे मोठे संकट ओढवले आहे. परंतु शासनस्तरावरून दुष्काळाशी सामना करण्यासाठीच्या हालचाली अतिशय संथ आहेत. त्यामुळे जनतेत दिवसेंदिवस संतापाची धार तीव्र होत आहे. दुष्काळाच्या झळा फेब्रुवारीतच गावोगावी बसण्यास सुरुवात झाली आहे. पिण्यास पाणी, जनावरांना चारा नाही. आगीत तेल ओतल्यागत महागाईचा आगडोंब उसळला आहे. परंतु मराठवाडय़ावर दुष्काळ निवारणाबाबत अन्याय केला जात असल्याचे चित्र मुंडे यांनी मुरूडच्या सभेत उभे केले. पश्चिम महाराष्ट्रातील जनतेला एक व मराठवाडय़ाला दुसरा न्याय हे पक्षपाती धोरण कशासाठी? असा थेट सवाल उपस्थित करणाऱ्या मुंडे यांनी अन्याय झाला तर मुंगीही चवताळून उठते, तेव्हा मराठवाडय़ातील माणसे गप्प बसतील असे कोणत्या आधारावर तुम्ही गृहीत धरले आहे, अशी तोफ डागली.
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या धोरणाचा मुंडे यांनी आपल्या भाषणात पंचनामा केला. मुरूडला मुंडे यांच्या उपस्थितीत पहिली दुष्काळी परिषद होती. त्याला मुंडेंच्या कल्पनेपेक्षाही चांगला प्रतिसाद मिळाल्यामुळे मुंडेंची कळी चांगलीच खुलली होती. लोकसभा व विधानसभा निवडणुकांना बराच कालावधी आहे. परंतु आतापासूनच मुंडे यांनी रणशिंग फुंकल्यामुळे हे वातावरण तापते ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्यासमोर आहे.
शिंग फुंकिले रणी, वाजताच चौघडे
सज्ज व्हा उठा उठा, सैन्य चालले पुढे
हे समरगीत मुंडे यांच्या मेळाव्यानिमित्त आळवले गेले. या गीतावरही चांगलीच चर्चा झाली. कारण मुंडेंच्या सोबतचे जे सैन्य आहे ते ठीकठाक आहे का? त्यांच्यात एकजूट आहे का? सर्वाना बरोबर घेऊन जाण्याची व्यूहरचना आहे का? असे अनेक सवाल विचारले जात होते. नितीन गडकरी राष्ट्रीय अध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर मुंडे यांच्या उपस्थितीतील लातुरातील मेळावा राजकीय मंडळींचे लक्ष वेधून घेणारा ठरला. लातूरच्या मेळाव्यात भाजपतील गट अनुपस्थित होता. तो स्वत:हून आला नाही, त्याला डावलले गेले, त्यांची अवहेलना केली गेली की आणखीन काही? ही चर्चाही आता सुरू आहे.
केंद्रात व राज्यात सत्तेवर असणाऱ्या सरकारला ‘चालते व्हा’चा इशारा मुंडे यांनी एकीकडे दिला. परंतु त्याच वेळी पक्षांतर्गत गटबाजीला मूठमाती देण्याची रचना त्यांनी केली नाहीतर त्यांनी दिलेल्या इशाऱ्याला काहीच किंमत उरणार नाही. मुंडेंच्या आयुष्यात संघर्ष हा पाचवीला पूजला आहे. त्यांनी अनेक वेळा परिस्थितीवर मात करीत विजय प्राप्त केला. आता नव्याने त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रातील निवडणुकांना सामोरे जाण्याचा निर्णय भाजपने केला आहे.
भाजपची अवस्था ही अमिबासारखी होते आहे. ही अंतर्गत गटबाजी थांबवण्यासाठीही त्यांना चांगलाच संघर्ष करावा लागणार आहे. भाजपतील अंतर्गत गटबाजी थांबवण्यात त्यांना यश आल्यास त्यांनी पुकारलेल्या लढय़ातील यश त्यांच्यापासून दूर जाणार नाही.