बडे आणि बकाल खेडे असे स्वरूप प्राप्त झालेल्या चांदीनगरी हुपरीला नगरपालिकेचा दर्जा देण्याचा निर्णय गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात झालेल्या एका बैठकीत जाहीर केला. या निर्णयाची उद्घोषणा अधिवेशनात शुक्रवारी करण्यात येणार आहे. येत्या ६ महिन्यात हुपरी नगरपालिका अस्तित्वात येऊन या दिशेने प्रशासनाची वाटचाल सुरू आहे. या निर्णयामुळे चांदीनगरीच्या प्रगतीला रुपेरी झळा प्राप्त होणार असल्याने हुपरीकरांनी निर्णयाचे पेढे वाटून स्वागत केले.
हातकणंगले तालुक्यातील सर्वात मोठे गाव म्हणून हुपरीचा उल्लेख केला जातो. ५७ हजार लोकसंख्या असलेल्या हुपरीला नगरपालिकेचा दर्जा मिळावा यासाठी गेली पंधरा वष्रे ग्रामस्थांचा पाठपुरावा सुरू होता. मुख्यमंत्र्यांकडे याबाबत तीन महिन्यांपूर्वी प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र निर्णयास विलंब लागत असल्याने गेल्या पंधरा दिवसांपासून हुपरीमध्ये बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले हाते. हुपरी नगरपालिका कृती समितीच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या जनआंदोलनास पाठिंबा वाढू लागला. आंदोलनाची तीव्रता वाढवत मंगळवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले होते. हुपरीतील या जनआंदोलनाची माहिती आमदार सुरेश हाळवणकर, डॉ. सुजित मिणचेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दालनात गुरुवारी बठक होऊन त्यांनी नगरपालिकेच्या प्रस्तावास मंजुरी दिली.
हुपरी नगरपालिका आगामी ६ महिन्यात अस्तित्वात येण्याची चिन्हे आहेत. येत्या महिनाभरात हरकती सूचना मागविण्यात येतील ३ महिन्यांनंतर प्रशासक मंडळ अस्तित्वात येईल आणि ६ महिन्यांनंतर हुपरीमध्ये मतदान होऊन पहिला नगराध्यक्ष, पालिकेचे नवे सभागृह अस्तित्वात येईल, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक अमजद नदाफ यांनी दिली. या बठकीस सहनिमंत्रक बाळासाहेब कांबळे, भाजपाचे सुदर्शन खाडे, मनसेचे दौलत पाटील, भाजपाचे रघुनाथ नलवडे, काँग्रेसचे बाळासाहेब रणदिवे आदी उपस्थित होते. यापूर्वी शासन महाराष्ट्र दिन वा स्वातंत्र्यदिनाचे निमित्त साधून राज्यात काही नगरपरिषदा अस्तित्वात येत असल्याची घोषणा करीत असे. पण एकच नगरपरिषद जाहीर करण्याची वेळ हुपरीच्या निमित्ताने प्रथमच आली असल्याने जनआंदोलनास वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.