News Flash

मतदान करा, हॉटेल व चित्रपटगृहांमध्ये सवलत मिळवा!

महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद

महापालिकेच्या आवाहनास प्रतिसाद

महापालिका निवडणुकीच्या प्रचारात सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केल्याने शहर निवडणूकमय झाल्याचे दिसत असले तरी मतदानासाठी नागरिक मोठय़ा प्रमाणावर बाहेर पडत नसल्याने राजकीय पक्षांनी आपआपल्या पध्दतीने त्यासाठी प्रयत्न करावयास सुरूवात केली आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या मतदान प्रकियेत नागरिकांचा अधिकाधिक सहभाग वाढावा यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रबोधन, जनजागृती अभियान राबविण्यास सुरूवात केली असून त्यास काही संस्था, हॉटेल संघटना, चित्रपट गृहांकडून सहकार्याचा हात पुढे करण्यात आला आहे. पालिकेकडून सायकल, मोटारसायकल फेरीही काढण्यात आली.

महापालिकेसाठी २१ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीतील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी पालिकेच्या वतीने शाळा, महाविद्यालय तसेच प्रसार माध्यमांमार्फत मतदार जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. उबेर इंडिया सिस्टिम प्रा.लि. ही खासगी प्रवासी वाहतूक संस्था मनपाच्या मतदार जनजागृती मोहीमेत सहभागी झाली असून आपल्या हजारो प्रवाश्यांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करीत आहे. उबेरकडे संपर्क करणाऱ्या प्रवाश्यांना मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी त्यांच्या सेवा शुल्कात सवलत देण्यात येणार आहे.

महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या आवाहनास प्रतिसाद देत दामोदर आणि विजयानंद या चित्रपगृहांचे मालक विनय चुंबळे यांनी मतदानाच्या दिवशी जे नागरिक मतदान करुन चित्रपट पाहण्यास येतील, त्यांना तिकीट दरात २० टक्के सवलत देण्यात येईल, असे जाहीर केले आहे. चित्रपटगृहात तिकीट काढतांना नागरिकांना मतदान केल्याची निशाणी म्हणून बोटाला लावलेली शाई दाखवावी लागणार आहे.

मतदार जनजागृतीसाठी शहरातील हॉटेल मालक-चालक संघटनेने आपल्या सभासद असलेल्या हॉटेलांमध्ये अन्नपदार्थाच्या देयकावर १० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सरचिटणीस श्रीधर शेट्टी यांनी दिली. महानगरपालिकेच्या वतीने मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी विविध उपRम हाती घेण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून मतदानाच्या दिवशी जे नागरिक मतदान करून हॉटेलमध्ये येतील, त्यांना हॉटेलमधील अन्नपदार्थाच्या देयकावर सवलत देण्यात येणार आहे. त्याकरीता नागरिकांनी मतदान केल्याचा पुरावा म्हणून बोटावरील शाईची खूण दाखवावी लागणार आहे.

पालिकेच्या वतीने मतदारांमध्ये जनजागृतीसाठी सर्व विद्यालयातील शिक्षक, शिक्षिका यांनी सायकल फेरी काढली. यावेळी शिक्षण मंडळाचे प्रशासक अधिकारी नितीन उपासनी व मतदार जनजागृती अभियानाची सदिच्छा दूत आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, नमिता कोहोक, निवडणूक विभागाचे सचिन विधाते हे उपस्थित होते. जीपीओ, खडकाळी सिग्नल, दूध बाजार, मेनरोड, रविवार कारंजा, पंचवटी, घारपुरे घाट, पंडित कॉलनी यामार्गे काढण्यात आलेल्या फेरीचा समारोप गोल्फ क्लब मैदानाजवळ झाला. या फेरीत मनपा शिक्षक व शिक्षिका मोठया प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. सायकलींवर मतदान जास्तीत जास्त करण्याविषयी संदेश देणारे फलक लावण्यात आले होते. फेरीत सहभागी झालेल्या शिक्षकांनी मतदान करण्यासाठी घोषणा दिल्या.

महानगरपालिकेच्या ‘होय, मी मतदान करणारच’ या मोहिमेअंतर्गत विविध उपRम हाती घेण्यात आले असून त्याअंतर्गत रविवारी मोटारसायकल फेरी काढण्यात आली. तसेच मतदार सेल्फी स्पर्धा ठेवण्यात आली आहे. २००७ च्या निवडणुकीत महापालिका मतदानाची टक्केवारी ६० होती. २०१२ च्या निवडणुकीत ती ५७ टक्क्य़ांपर्यंत खाली आली. या निवडणुकीत टक्केवारी वाढावी यासाठी महानगरपालिका प्रयत्नशील आहे. त्याअंतर्गतच नाशिक महानगरपालिका व कविता राऊत फाऊंडेशन, नाशिक सिटीझन्स फोरम (एनसीएफ), नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (निमा), अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (आयमा), नाशिक येझदी जावा क्लब (एनवायजेसी) आणि Rुझिंग गॉडस् यांच्या वतीने मतदान जागृत्तीसाठी रविवारी मोटार सायकल फेरी काढण्यात आली. महात्मानगर मैदानापासून फेरीला सुरूवात करण्यात आली. भोसला चौक, कॉलेजरोड, कॅनडा कॉर्नर, शरणपूररोड, राजीव गांधी भवन, जुने सीबीएस, जिल्हा न्यायालय, अशोक स्तंभ, रविवार कारंजा, शालिमार, गडकरी चौक, मायको सर्कल, एबीबी सर्कल व पुन्हा महात्मानगर मैदान अशी फेरी झाली. ‘होय मी मतदान करणारच!’ असे फलक लावलेल्या विविध प्रकारच्या मोटारसायकली नाशिककरांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ठरल्या. कविता राऊतसह नाशिक  सिटीझन्स  फोरमचे अध्यक्ष सुनील भायभंग,  जितेंद्र ठक्कर, विजय संकलेचा. संदीप जाधव, नितीन उपासनी, महेश तुंगार, मकरंद उदावंत, अंबरीश मोरे आदी यावेळी उपस्थित होते.

मतदार ‘सेल्फी’ स्पर्धा

युवावर्गात भ्रमणध्वनीव्दारे ‘सेल्फी’ अधिक प्रमाणावर काढल्या जात असल्याने मतदार जागृतीसाठी या सवयीचा वापर करून घ्यावा म्हणून कविता राऊत फाऊंडेशन, नाशिक सिटीझन्स फोरम, नाशिक इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, अंबड इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन, Rेडाई यांच्या वतीने ‘मतदार सेल्फी स्पर्धा’ ठेवण्यात आली आहे. यासाठी नाशिककरांनी मतदान केल्यानंतर स्वत:च्या भ्रमणध्वनीवरून ७७६८००२४२४ या नंबरवर  मतदान केल्याच्या हाताच्या बोटावरील  शाईच्या निशाणीसह सेल्फी अपलोड करण्याबाबत आवाहन करण्यात येत आहे. या स्पर्धेतील भाग्यवान मतदारांना  विविध  सामाजिक  संस्थेमार्फत बक्षिसे देण्यात  येणार आहेत. बक्षिसांची निवड सोडत पद्धतीने करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2017 1:00 am

Web Title: municipal corporation elections 2017 3
Next Stories
1 सोलापुरात प्रचाराच्या तोफा थंडावल्या..
2 मतदानादिवशी आठवडा बाजार बंद
3 सहकारी सूतगिरण्यांतील कामगारांची १५ कोटींची देणी बाकी
Just Now!
X