पालघर नगरपरिषदेचा निधी अपहार प्रकरण

दोन रस्त्यांच्या कामांचे दुबार देयक काढून पालघर नगरपरिषदेच्या सुमारे चार लाख ६४  हजार ४९९ रुपयांच्या शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन मुख्याधिकारी वैभव आवारेसह काम ठेकेदार ए. गोविंदू, लिपिक संतोष जोशी, निवृत्त लेखापाल बाळकृष्ण जाधव यांच्यावर पालघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पालघर नगरपरिषद हद्दीमध्ये प्रभाग क्र.२५ मध्ये २०१३-१४ ला मोहपाडा परिसरातील दोन रस्त्याच्या काँक्रीटीकरण कामाची निविदा काढण्यात आली होती. ही दोन्ही कामे ए. गोविंदू या ठेकेदाराने पूर्ण केली. या दोन कामांसाठी नगरपरिषदेने अनुक्रमे एक लाख ४८ हजार ७९५ व तीन लाख १५ हजार ७०४ (देयकातील आयकर व तत्सम रक्कम वजा करून) अशी चार लाख ६४ हजार ४९९ रुपये रक्कम सर्व सोपसकर प्रक्रिया पार पडल्यानंतर ठेकेदार गोविंदू याला २६ मार्च २०१४ ला धनादेशद्वारे अदा केली होती. देयके दिल्यानंतरही पुन्हा त्याच कामासाठी नगरपरिषदेने दुसऱ्यांदा तेवढीच रक्कम १० एप्रिल २०१४ ला धनादेशाद्वारे पुन्हा त्याच ठेकेदाराला सर्वाच्या संगनमताने अदा करण्यात आली.

नगरपरिषदेच्या कामकाजाच्या हिशेबाचे स्थानिक लेखापरीक्षण होत असताना ही बाब लेखापरीक्षकांच्या निदर्शनास आली. त्यानंतर या प्रकरणी नगरसेवक कैलास म्हात्रे यांनी २०१७ मध्ये मुख्याधिकाऱ्यांकडे तक्रार केली. त्यानंतरही या प्रकरणावर कोणतीही कारवाई होत नसल्याने कैलास म्हात्रे यांनी पालघर कनिष्ठ दिवाणी न्यायालयात २०१७ मध्ये याचिका दाखल केली. या प्रक्रियेत सुमारे दीड वर्ष विलंब झाल्यामुळे म्हात्रे यांनी डिसेंबर २०१८ ला या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली.

चार महिन्यांनी न्यायमूर्ती धर्माधिकारी व सारंग कोतवाल या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने संबंधित प्रकरणातील पाचही आरोपीवर तरतूद केलेल्या नियमानुसार आठ आठवडय़ात कारवाई करावी, असे सूचित केले.

पालघर सत्र न्यायालयाने या प्रकरणात आदेश देण्याचे हक्क कनिष्ठ न्यायालयाला असल्याचे सांगून त्यांनी याप्रकरणात आदेश द्यावा असे सांगितल्यानंतर शनिवार सात सप्टेंबर रोजी कनिष्ठ न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायाधीश तेलगावकर यांनी पाचही आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालघर पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार पालघर पोलीस ठाण्यात सोमवारी चार जणांवर गुन्हा दाखल झाला.

एका सहआरोपीची पुनर्विचार याचिका

या प्रकरणातील सहआरोपी तत्कालीन शाखा अभियंता प्रेमचंद मिश्रा यांनी या प्रकरणात न्यायालयाकडे पुनर्विचार याचिका दाखल करून त्यावर स्थगिती आणल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे आता या प्रकरणात पालघर पोलिसांची भूमिका महत्त्वाची राहणार आहे.