२०० कोटींचा टप्पा पार; पालिकेच्या विविध मोहिमांना यश

वसई-विरार महापालिकेने मालमत्ता कर वसुलीसाठीची मोहीम हाती घेतल्यानंतर गेल्या काही वर्षांपेक्षा यंदा सर्वाधिक वसुली करण्यात आली आहे. यंदा महापालिकेने २०० कोटींचा टप्पा गाठला असून या महिन्याच्या अखेरीस त्याच वाढ होणार आहे, असे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले. करवसुली करण्यासाठी महापालिकेने विविध मोहिमा हाती घेतल्या होत्या.

मालमत्ता कर महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. २०१८—१९ या आर्थिक वर्षांत महापालिकेने तब्बल ३०० कोटी रुपयांचे मालमत्ता कराच्या वसुलीचे उद्दिष्ट ठेवले होते. वसई-विरार शहरात ७ लाख ४२ हजार औद्योगिक व वाणिज्य असे मालमत्ताधारक आहेत.

मालमत्ता कर भरण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०१८ असल्याने या महिन्याअखेर महापालिकेने १४० कोटींचा टप्पा पूर्ण केला होता. त्यानंतर दोन टक्के शास्ती लावून कराची रक्कम वसूल करण्यास सुरुवात केली.

मालमत्ता करवसुलीसाठी महापालिकेने यंदाच्या वर्षी कंबर कसली. त्यासाठी नियोजन करून विशेष मोहीम राबवण्यात आल्या. त्याचा परिणाम म्हणून पालिकने १४ मार्चपर्यंत २०० कोटी रुपयांची वसुली करण्यात यश मिळवले आहे. आतापर्यंतची ही सर्वाधिक विक्रमी वसुली आहे.

गेल्या वर्षी २०१७-१८ मध्ये पालिकेने १६४ कोटी, तर त्या आधी २०१६-१७ या वर्षांत १२७ कोटी वसुली केली होती. पालिकेकडे अजूनही १५ दिवसांचा कालावधी शिल्लक असल्याने वसुलीचा आकडा अधिक वाढणार आहे.

पालिकेची विशेष मोहीम

यंदा करवसुली करण्यासाठी महापालिकेने ठेका पद्धतीवर अतिरिक्त ११० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. महापालिका क्षेत्रातील वसई, नालासोपारा, विरार, वालीव, आचोळे, बोळींज, पेल्हार, चंदनसार, नवघर-माणिकपूर अशा प्रभागांत हे कर्मचारी कार्यरत आहेत. गृहसंस्था, औद्य्ोगिक वसाहती अशा ठिकाणीजावून कर भरणा करण्याचे आवाहन देयके, नोटीस देण्याचे काम हे कर्मचारी करत आहेत. सुट्टीच्या दिवशीही कर्मचारी मालमत्ता कर संकलनाचे काम करत आहेत. प्रत्येक प्रभागातील सहाय्यक आयुक्त यांच्याकडूनही मालमत्ता कर वसुलीबाबतचा नऊ प्रभागांतील अहवाल अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांच्यामार्फत दररोज तपासला जात आहे.

जनजागृती आणि कारवाईचा परिणाम

मालमत्ता कर नागरिकांनी भरावा यासाठी पालिकेने सातत्याने जनजागृती मोहिम हाती घेतली होत्या. पालिका कर्मचाऱ्यांनी दुचाकी रॅली काढली.  थकबाकीदारांविरोधात कडक कारवाई करण्यास सुरुवात केली. थकबाकीदारांचे नावे शहरातील चौकात लावली होती. थकबाकीदारांच्य नळजोडण्या खंडीत करण्यात आल्या होत्या तसेच मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. त्यामुळे मालमत्ता करवसुलीचा आकडा वाढला, असे पालिकेने सांगितले.

महापालिकेने गेल्या वर्षांपेक्षा यंदा सर्वाधिक वसुली केली आहे. यंदा महापालिकेने मालमत्ता कराचे विशेष धोरण अवलंबल्याने आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी घेतलेले मेहनतीमुळे चांगल्या प्रकारे मालमत्ता कर वसूल झाला. अजूनही करवसुलीचे काम सुरू असून मार्च अखेपर्यंत चांगली वसुली होईल.

– संजय हेरवाडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका