रत्नागिरी नगर परिषदेची आगामी निवडणूक भाजपबरोबर युती करून लढवण्यास शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा विरोध असल्याचे चित्र पुढे येत आहे.
राज्यातील येत्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये सार्वत्रिक निवडणुका होत असलेल्या नगर परिषदांमध्ये रत्नागिरीचाही समावेश आहे. त्यादृष्टीने वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यापूर्वीच या निवडणुकीबाबत स्वबळाचा नारा दिला आहे. आता सेनेच्या कार्यकर्त्यांनी ‘जशास तसे’चा पवित्रा घेतला आहे. सेनेचे आमदार उदय सामंत यांच्या निवासस्थानी काल तालुक्यातील करबुडे, शिरगाव आणि कोतवडे या तीन जिल्हा परिषद गटांमधील कार्यकर्त्यांची बैठक झाली. सेनेचे जिल्हा पातळीवरील पदाधिकारीही या बैठकीला उपस्थित होते. यावेळी बहुसंख कार्यकर्त्यांनी आगामी नगर परिषद निवडणुकीत भाजपबरोबर युतीच्या विरोधात भूमिका घेतल्याचे आमदार सामंत यांनी बुधवारी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. या तिन्ही जिल्हा परिषद गटातील शिवसैनिकांनी तसे ठरावच केले असल्याचे नमूद करून सामंत म्हणाले की, या निवडणुका स्वबळावर लढण्याची आमची पूर्ण तयारी आहे. स्वतंत्रपणे निवडणुका लढवल्यास सेनेचा लाभच होईल, हे काही महिन्यांपूर्वी झालेल्या चार पोटनिवडणुकांनी सिद्ध केले आहे. मात्र सेनेच्या कार्यपद्धतीनुसार पक्षप्रमुखांसह संघटनेचे पदाधिकारी त्याबाबतचा अंतिम निर्णय घेतील, अशी पुस्तीही सामंत यांनी जोडली. शहराच्या नगराध्यक्षांची थेट निवडणूक घेण्याच्या निर्णयाचाही सेनेलाच फायदा होईल, असे सांगून शहराच्या कोणत्याही भागात गेले तरी सेनेचेच प्राबल्य असून डिसेंबरात सेनेचा नगराध्यक्ष झालेला दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. दरम्यान रत्नागिरी नगर परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक आमदार सामंत यांनी बुधवारी सकाळी घेऊन शहरातील विकासकामांच्या प्रगतीचा आढावा घेतला. आमदार किंवा पालकमंत्री या नात्याने त्यांनी निधी उपलब्ध करून दिलेल्या नाना-नानी पार्क, स्कायवॉक, प्लास्टिक निर्मूलन मोहीम, दीपगृह, एलईडी पथदीपांची व्यवस्था इत्यादींचा त्यामध्ये समावेश होता. ही सर्व कामे समाधानकारकपणे चालू असल्याचा निर्वाळा सामंत यांनी बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना दिला. तसेच शहराला पाणीपुरवठय़ासाठी महत्त्वाच्या ६८ कोटी रुपये खर्चाच्या योजनेचे सादरीकरण आणि चर्चा येत्या १८ मे रोजी नगर परिषदेत आयोजित केली असल्याचे सांगितले. या विषयाबाबत तांत्रिक ज्ञान किंवा रस असलेल्या नागरिकांनीही या प्रसंगी उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.