राजापूर नगर परिषदेच्या आगामी पंचवार्षिक निवडणुकीच्या अनुषंगाने शनिवारी पडलेल्या नगरसेवकपद आरक्षण सोडतीमध्ये सतरापैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव झाल्या आहेत. त्यामुळे आगामी पंचवार्षिक निवडणुकीनंतर नगर परिषदेमध्ये महिलाराज येणार आहे. तर, खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झालेल्या सहा जागांवर इच्छुकांची उमेदवारीसाठी चांगलीच झुंबड उडण्याची शक्यता आहे. तर, विद्यमान नगरसेवकांच्या जागांना कोणताही धक्का लागलेला नसल्याने त्यांना पुन्हा निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे.

राजापूरचे प्रांताधिकारी सुशांत खांडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज नगर परिषदेच्या नाथ पै सभागृहामध्ये नगरसेवकपदाची आरक्षण सोडत झाली. यावेळी मुख्याधिकारी श्रीमती ससाणे यांच्यासह विद्यमान नगरसेवक आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नगर परिषदेच्या नव्या प्रभागरचनेमध्ये आठ प्रभाग करण्यात आले असून पहिले सात प्रभाग द्विसदस्यीय असून प्रभाग क्रमांक आठ हा त्रिसदस्यीय राहणार आहे. या आठ प्रभागातील सतरा जागांसाठी आज आरक्षण सोडत झाली. या आरक्षण सोडतीमध्ये सतरापैकी नऊ जागा महिलांसाठी राखीव राहिल्या. त्यामध्ये सहा जागा सर्वसाधारण स्त्री, तर तीन जागा नामप्र स्त्रीसाठी राखीव झाल्या आहेत. महिलांसाठी राखीव झालेल्या जागांपैकी सर्वसाधारण स्त्री म्हणून राखीव झालेल्या जागांमध्ये प्रभाग-१ (ब), प्रभाग-४ (ब), प्रभाग-५ (अ), प्रभाग-६ (ब), प्रभाग-७ (अ), प्रभाग-८ (ब) यांचा, तर नामप्र स्त्री राखीव असलेल्या जागांमध्ये प्रभाग-२ (अ), प्रभाग-३ (ब), प्रभाग-८ (क) यांचा समावेश आहे. महिलांसाठी राखीव झालेल्या जागांव्यतिरिक्त शिल्लक राहिलेल्या आठ जागांपैकी प्रभाग-४ (अ), आणि प्रभाग-७ (ब) या दोन जागा नामप्र राखीव, तर प्रभाग-१ (अ), प्रभाग-२ (ब), प्रभाग-३ (अ), प्रभाग-५ (ब), प्रभाग-६ (अ), प्रभाग-८ (अ) या सहा जागा खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्या आहेत. नगरसेवक आरक्षण सोडतीमध्ये महिलांसाठी नऊ जागा राखीव झाल्या असून, या राखीव जागांवर उमेदवारी मिळविण्यासाठी प्रमुख राजकीय पक्षांमध्ये चांगलीच चुरस होण्याची शक्यता आहे. तर केवळ आठ जागांवर पुरुष मंडळींना निवडणूक लढविण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे या जागांवरही उमेदवारीसाठी संधी मिळविण्यासाठी पुरुष मंडळींमध्ये जोरदार रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. नगर परिषदेचे विद्यमान प्रभारी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक हनिफ युसूफ काझी यांचे प्रभाग यावेळी महिलांसाठी राखीव झाल्याने त्यांना आपापल्या मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची संधी मिळणार नाही. मात्र, त्यांचा असलेला दांडगा जनसंपर्क लक्षात घेता त्यांना पक्षाकडून अन्य मतदारसंघातून उतरविले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.