राज्यातील १० महापालिकांमध्ये मतदान सुरु असतानाच अकोला आणि सोलापूरमध्ये मतदान केंद्राच्या आवारात दोन मतदारांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अकोलामध्ये मतदान केंद्रातून बाहेर पडताना एका मतदाराला ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यू झाला. तर सोलापूरमध्ये मतदान केंद्रातील रॅम्पवरुन पडल्याने एकाचा मृत्यू झाला.

अकोला महापालिका क्षेत्रातील गोरक्षण रोडवरील कैलासनगर भागात राहणारे दीपक खानझोडे हे मंगळवारी सकाळी मतदान करुन घरी परतले. घरी परतल्यावर त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखलही करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. दीपक खानझोडे हे अकोला अर्बन बँकेत नोकरीला होते. दीपक खानझोडे यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.

सोलापूरमध्येही मतदान केंद्राच्या परिसरात पडून एका मतदाराचा मृत्यू झाला. सोलापूरमध्ये प्रभाग क्रमांक ८ मधील ग. ल. कुलकर्णी प्रशाळेत ७० वर्षीय गंगाधर शेटे हे मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेले होते. मात्र मतदान केंद्रातील रॅम्पवरुन शेटे पाय घसरुन पडले. या घटनेत त्यांचाही मृत्यू झाला.

दरम्यान, अकोलामधील २० प्रभागांतील ८० जागांसाठी ५७९ उमेदवार रिंगणात आहेत. गेल्या ५ वर्षांच्या कार्यकाळात पहिले अडीच वर्षे काँग्रेस, भारिप-बमसं व राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यानंतर अडीच वर्षे भाजप व शिवसेना सत्तेत होती. आता सर्वच पक्ष स्वबळावर निवडणूक लढत असल्याने कोणत्याही एकाच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळवणे कठीण होणार आहे. सत्ता कायम राखण्यासाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. तर दुसरीकडे सोलापूरमध्ये १०२ जागांसाठी ४७८ उमेदवार नशीब आजमावत आहे.