चंद्रपूर, लातूर आणि परभणी या तीन महानगरपालिकांचे निकाल जाहीर झाले असून लातूरमध्ये भाचंदजपने एकहाती सत्ता स्थापन केली आहे. तर चंद्रपूरमध्येही भाजपने निर्णायक आघाडी घेतली आहे. चंद्रपूरमधील पक्षाने आघाडी घेतल्याने सुधीर मुनगंटीवार आणि केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांना प्रतिष्ठा राखण्यात यश आले आहे.

चंद्रपूर, लातूर आणि परभणी या तीन महापालिकांसाठी दोन दिवसांपूर्वी मतदान झाले होते. उन्हाळ्यामुळे या शहरांमधील मतदानाची वेळ वाढवण्यात आली होती. चंद्रपूरमध्ये ५७ टक्के, परभणीत ७० टक्के आणि लातूरमध्ये ६० टक्के मतदान झाले होते.

चंद्रपूरमध्ये ६६ जागांसाठी ४६० उमेदवार रिंगणात होते. भाजप विरुद्ध काँग्रेस अशी सरळ लढत येथे आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांची प्रतिष्ठापणाला लागली होती. विकासाच्या मुद्यावर भाजप सत्तेत येईल असा विश्वास भाजप नेते व्यक्त करत होते. काँग्रेसची धुरा माजी खासदार नरेश पुगलिया यांच्याकडे असून भाजपचे आव्हान ते रोखणार का याची उत्सुकता होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसाठी चंद्रपूरची निवडणूक अस्तित्वाची लढाई होती. भाजपने ६६ पैकी एकाही जागेवर मुस्लीम उमेदवार दिलेला नव्हता. चंद्रपूरमधील जिल्हा क्रीडा संकुलात मतमोजणीला सुरुवात झाली.

लातूरमध्ये ७० जागांसाठी ४०७ उमेदवार रिंगणात होते. येथेही काँग्रेस विरुद्ध भाजप अशी थेट लढत होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः लातूरमध्ये प्रचारसभा घेतली होती. लातूर हा काँग्रेसचे दिवंगत नेते विलासराव देशमुख यांचा गड मानला जातो. काँग्रेस आमदार अमित देशमुख यांच्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती. पालकमंत्री व भाजप नेते संभाजी निलंगेकर-पाटील यांचीही प्रतिष्ठा पणाला लागली होती. बार्शीरोडवर शासकीय तंत्रनिकेतन येथे सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली. लातूरमध्ये गेल्या वेळच्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतदान कमी झाले होते. मतमोजणीत लातूरकरांनी भाजपला साथ दिल्याचे स्पष्ट झाले. ७० पैकी ३६ जागांवर विजय मिळवत भाजपने स्पष्ट बहुमत मिळवले. तर काँग्रेसला ३३ जागा मिळवल्या आहेत.

परभणीमध्ये ६५ जागांसाठी ४१८ उमेदवार रिंगणात असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात होती. पुणे, पिंपरी-चिंचवड गमावल्यानंतर आता परभणीतील वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेससमोर होते. शिवसेनेने राष्ट्रवादीसमोर आव्हान निर्माण केले असून भाजपला परभणीकडून फारशा अपेक्षा नाहीत. त्यामुळे या शहरात शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत होणार असे दिसते. मात्र शिवसेनेला शहरात छाप पाडता आली नसून काँग्रेसने परभणीत आघाडी घेत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

LIVE UPDATES:

०३:२८: लातूरमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत, भाजप ४१ तर काँग्रेस २८ जागांवर विजयी

०२:३४: चंद्रपूरमध्ये भाजप ३२ जागांवर आघाडीवर, काँग्रेस दुसऱ्या स्थानी

०१:१९: लातूरमध्ये ७० जागांचे निकाल जाहीर, भाजप – ३८, काँग्रेस – ३१, राष्ट्रवादी काँग्रेस एका जागेवर विजयी

०१:११: लातूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसला धक्का, भाजपला स्पष्ट बहुमत

१२:५२: चंद्रपूरमध्ये भाजप २७, काँग्रेस ११, राष्ट्रवादी काँग्रेस २,  शिवसेना एक तर अन्य पक्षांची उमेदवार तीन जागांवर आघाडीवर

१२:१९:परभणीत काँग्रेस २१ तर राष्ट्रवादी काँग्रेस ११ जागांवर आघाडीवर

१२:०८: चंद्रपूरमध्ये भाजप १२ तर काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर

१२:०६: लातूरमध्ये भाजप ३४ तर काँग्रेस २४ जागांवर आघाडीवर.

११:४७: चंद्रपूरमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर, भाजप ८ तर काँग्रेस ७ जागांवर आघाडीवर.

११:४५: परभणीत काँग्रेस १४ तर राष्ट्रवादी काँग्रेस ८ जागांवर आगाडीवर, भाजप आणि शिवसेना प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर

११:२७: चंद्रपूरमध्ये प्रभाग क्रमांक २ मध्ये भाजपच्या २ तर काँग्रेस १ आणि एका अपक्ष उमेदवाराचा विजय

११:२०: परभणीत प्रभाग क्रमांक ८ मधून काँग्रेसचे चारही उमेदवार विजयी

११:१४: चंद्रपूरमधील प्रभाग क्रमांक १ मध्ये भाजप उमेदवार विजयी.

११:१४: लातूरमध्ये भाजप २४ तर काँग्रेस १९ जागांवर आघाडीवर

११:११: परभणीत काँग्रेस ८ जागांवर, राष्ट्रवादी काँग्रेस ३, भाजप आणि शिवसेना प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर.

११:०६: लातूरमध्ये भाजप आणि काँग्रेस प्रत्येकी २० जागांवर आघाडीवर

१०:५६: चंद्रपूरमध्ये भाजप ४ जागांवर आघाडीवर.

१०:५५: लातूरमध्ये भाजप १५ तर काँग्रेस २० जागांवर आघाडीवर

१०:४६: परभणीत काँग्रेस ३ तर भाजप २ जागांवर आघाडीवर

१०:४४: लातूरमध्ये काँग्रेस १३ तर भाजप १२ जागांवर आघाडीवर

१०:३०: चंद्रपूर, लातूर आणि परभणीत मतमोजणीला सुरुवात