25 September 2020

News Flash

बंडखोरीमुळे अकोल्यात राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता

अकोला महापालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अकोल्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली.

अकोला महापालिकेच्या निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अकोल्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. या निवडणुकीत प्रथमच युती व आघाडी न करता चारही प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक लढत आहेत. त्यामुळे दिग्गज उमेदवारांची मोठय़ा प्रमाणात पळवापळवी झाली. निष्ठावंतांना डावलून सर्वच पक्षांनी आयारामांना संधी दिली. परिणामी बंडखोरीसह पक्षातील अंतर्गत कलहाचा धोका राहणार असून, बहुमतासाठी ४१चा जादुई आकडा पार करण्याचे मोठे आव्हान सर्वच पक्षांना आहे.

२० प्रभागांतील ८० जागांसाठी ५७९ उमेदवार रिंगणात आहेत. २१ फेब्रुवारीला महापालिकेची निवडणूक होत आहे. या निवडणुकीच्या मदानात भाजप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारिप-बहुजन महासंघ, एमआयएम, मनसे आदी प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार उतरवले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकीतील मोठे यश लक्षात घेता इच्छुकांचा सर्वाधिक ओढा भाजपकडे होता. त्यासाठीच भाजपने उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. त्यामुळे बंडखोरीला काही प्रमाणात लगाम बसला. भाजपने ७४ जागांवर उमेदवार दिले असून, त्यापकी एक जागा रिपाइंसाठी सोडली आहे. या वेळी प्रथमच भाजपने चार मुस्लीम उमेदवार दिले आहेत. भाजपने विद्यमान महापौर उज्ज्वला देशमुख, योगेश गोतमारे, कल्पना गावंडे, गोपी ठाकरे, नम्रता मोहोड या पाच जणांना उमेदवारी नाकारली. महापौर उज्ज्वला देशमुख यांचे पक्षासोबत सलोख्याचे संबंध नव्हते. त्याचप्रमाणे भाजपमधील गटबाजीही त्यांच्या उमेदवारीस मारक ठरली. योगेश गोतमारे यांची उमेदवारी तांत्रिक कारणावरून, तर नम्रता मोहोड यांचे पती मनीष मोहोड यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने त्यांना उमेदवारी मिळणार नाही, हे निश्चितच होते. कल्पना गावंडे यांना यांचे यांचे पती अजय गावंडे यांनी विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्याचा फटका बसला. गोपी ठाकरे यांनाही गटबाजीतून उमेदवारी नाकारण्यात आली. २०१२च्या निवडणुकीत बंडखोरी करून निवडून आलेल्यांमध्ये गोपी ठाकरे यांचा समावेश होता. त्यापकीच विजय अग्रवाल, सुनिता अग्रवाल आणि संजय बडोणे यांना उमेदवारी देण्यात आली. पक्षात नव्याने प्रवेश घेणाऱ्या उमेदवारांना थेट उमेदवारी देण्यात आली असून, गेल्या अनेक वर्षांपासून भाजपमध्ये काम करीत असलेल्यांना उमेदवारी नाकारल्याने काही प्रभागांत सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. निवडणूक प्रमुख म्हणून खा. संजय धोत्रे, तर सहप्रमुख म्हणून आ. गोवर्धन शर्मा यांच्याकडे जबाबदारी आहे. या निवडणुकीत आ. रणधीर सावरकर यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघातील ३४ जागांवर भाजपचे लक्ष्य आहे.

सहा जोडपी व मायलेक रिंगणात 

अकोला महापालिकेच्या निवडणूक िरगणात सहा जोडपी आहेत. भाजप, राष्ट्रवादी व शिवसेनेने जोडप्यांना उमेदवारी दिली आहे. निवडणुकीत करुणा भारसाकळ व प्रशांत हे माय-लेकही रिंगणात आहेत.

राष्ट्रवादीचे सर्वाधिक उमेदवार     

राष्ट्रवादी काँग्रेसने ७४ उमेदवार निवडणूक िरगणात उतरवले आहेत. विधानसभा निवडणुकीच्या ऐनवेळी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्याने विजय देशमुख यांनी अकोला पश्चिम मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढली. त्यानंतर जिल्हाध्यक्षपदाची माळही त्यांच्या गळ्यात पडली. तेव्हापासून त्यांचे समर्थक नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश घेतील याची चर्चा होती. त्यानुसार मनपा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला िखडार पाडून १० नगरसेवकांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतला. शिवसेनेचे पश्चिम विदर्भातील मातबर नेते व माजी राज्यमंत्री गुलाबराव गावंडे यांनीही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घेतल्याने पक्षाची ताकद वाढली आहे. मनपा निवडणुकीसाठी इतर पक्षांतील असंतुष्टांवर लक्ष्य केंद्रित करून त्यांना उमेदवारी देण्यावर राष्ट्रवादी पक्षाने भर दिला आहे. अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका उषा विरक यांनी पतीसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. दोघांनीही राष्ट्रवादीतर्फे अर्ज दाखल केला. भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सर्वाधिक इच्छुकांनी प्रवेश घेतला आहे. काँग्रेसला सर्वात जास्त फटका बसला. काँग्रेसनेही आपले अल्पसंख्याक आणि बहुजनचे कार्ड वापरून उमेदवारांची यादी जाहीर केली. शिवसेनेने विद्यमान नगसेवकांसह इतर पक्षातून आलेल्यांना संधी दिली. शिवसेनेनेही ७३ उमेदवार दिले आहेत. भारिप-बहुजन महासंघानेही सर्वसमावेशक उमेदवार दिले आहेत. मनपाची हद्दवाढ भारिप-बहुजन महासंघासाठी लाभदायक ठरू शकते. एमआयएमनेही १० प्रभागांवर लक्ष्य केंद्रित करत १६ उमेदवार निवडणूक िरगणात उतरवले आहेत. मनसेने १८ उमेदवार दिले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2017 12:06 am

Web Title: municipal elections in akola
Next Stories
1 पोलीस ठाण्यात मतदारांना मिळणार उमेदवारांच्या गुन्ह्यांची माहिती; नाशिक पोलिसांचा उपक्रम
2 महापालिका निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये ४६४ संशयितांवर प्रतिबंधात्मक कारवाई
3 भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणा-या रिपाइंच्या उमेदवारांचे निलंबन
Just Now!
X