News Flash

शिरपूर, दोंडाईचात नगराध्यक्षपदासाठी दिग्गजांची प्रतिष्ठा पणास

विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला शिरपूर शहरातून मोठय़ा प्रमाणात मतदान झाले होते.

जिल्ह्यातील दोंडाईचा आणि शिरपूर नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे सर्वसामान्यांचे मनोरंजन होत असताना या दोन्ही ठिकाणी प्रतिष्ठित राजकीय घराण्यांमधील उमेदवार रिंगणात असल्याने निवडणुकीला चांगलेच ‘वजन’ प्राप्त झाले आहे.

दोंडाईचात ‘गढीवरचे सिंह’ आपल्या शिलेदारांसह तर शिरपूर पॅलेसमधील हुकमी मंडळी आपल्या फौजेसह प्रभागात फिरू लागली आहे. दोन्ही ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीस राजकीयदृष्टय़ा वलय प्राप्त झाल्याने आपआपल्या घराण्यातील उमेदवाराच्या विजयासाठी काहीही करण्याची तयारी उभयंतांनी ठेवली आहे.

दोंडाईचामध्ये विद्यमान मंत्री जयकुमार रावल आणि माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख यांच्यात विळा-भोपळ्याचे नाते आहे. या दोन्ही नेत्यांनी एकमेकांच्या विरोधात दिलेले नगराध्यक्षपदाचे उमेदवार हे त्यांच्या स्वत:च्या घरातील असल्याने दोघाही नेत्यांच्या भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य काळातील राजकारणाची कल्पना यावी असे चित्र आपोआपच तयार झाले आहे. डॉ. देशमुख यांचे बंधू डॉ. रवींद्र हे काँग्रेस, तर जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुंवर या भाजपकडून नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहेत. शिरपूरमध्ये भाजपच्या अमृता महाजन आणि काँग्रेसच्या जयश्रीबेन पटेल या रिंगणात आहेत. शिरपूरचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी, तर दोंडाईचाचे पद खुल्या प्रवर्गासाठी आहे. दोन्ही जागांवर प्रतिस्पध्र्यांनीही दमदार उमेदवार उभे केले आहेत.

विधानसभा निवडणुकीवेळी भाजपला शिरपूर शहरातून मोठय़ा प्रमाणात मतदान झाले होते. त्यामुळेच पालिकेवर ताबा मिळू शकेल, असा विश्वास भाजपच्या गोटात आहे. राज्यात आपल्याच पक्षाची सत्ता असणे हे पथ्थ्यावर पडेल, असे भाजप नेत्यांना वाटते.

दुसरीकडे कायम काँग्रेसला साथ देणारे शिरपूरकर भाजपला स्वीकारणार नाहीत, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. अमरीश पटेल यांच्यासाठी ही निवडणूक त्यांच्या लोकप्रियतेत वाढ करणारी ठरेल की घट करणारी याविषयी सर्वानाच उत्सुकता आहे. राज्यात कोणत्याही पक्षाचे वारे असले तरी शिरपूरवरील पकड अमरीश पटेल यांनी कमी होऊ दिलेली नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 12:48 am

Web Title: municipal elections in dhule
Next Stories
1 ‘नोटां’ची शाई उजव्या तर्जनीलाच!
2 व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या ‘ईबीसी’ची विद्यार्थ्यांना प्रतीक्षा
3 नागपूरमध्ये स्टेट बँकेच्या कर्मचाऱ्याचा मृत्यू, नोटाबंदीनंतर देशभरात ३५ हून अधिक बळी