जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी प्रशासनाने सुरू केली असून इस्लामपूर, आष्टा, तासगाव आणि विटा या ठिकाणच्या प्रारूप प्रभाग रचना आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी बुधवारी जाहीर केला. राज्य निवडणूक आयोगाच्या  आदेशानुसार हा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी शेखर गायकवाड म्हणाले, इस्लामपूर, आष्टा, तासगाव व विटा नगरपरिषदेचे प्रारूप प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची अधिसूचना कलम १० अनुसार मतदारांच्या माहितीसाठी व हरकती, सूचना सादर करणे, तसेच या सूचना हरकती व त्यावरील सुनावणीचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात आला आहे. सोडतीच्या वेळी प्रारूप रचनेचा नकाशा व त्याच्या चतुसीमा, सोडतीसाठी येणाऱ्या नागरिकांना माहितीसाठी संबंधित नगरपरिषद कार्यालयात व नोटीस बोर्डावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.

इस्लामपूर, आष्टा, तासगाव व विटा नगरपरिषदेची प्रभाग रचना, आरक्षण व सोडत सूचना हरकती व सुनावणीचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. नगरपरिषद सदस्य पदांच्या आरक्षणाच्या सोडती दिनांक, वेळ, नगरपरिषदेचे नाव, ठिकाण व संबंधित अधिकारी अनुक्रमे पुढीलप्रमाणे. (१) २ जुल २०१६, सकाळी ११ वाजता, इस्लामपूर नगरपरिषद, लोकनेते राजारामबापू पाटील नाटय़गृह इस्लामपूर, उपविभागीय अधिकारी वाळवा भाग इस्लामपूर, आष्टा नगरपरिषद, आष्टा नगरपरिषदेचे आनंदराव देसावळे सभागृह आष्टा बाजारवाडी, विशेष भूमि संपादन अधिकारी क्र. ७ महसूल भवन मिरज, तासगाव नगरपरिषद, तासगाव नगरपरिषद नाटय़गृह, उपविभागीय अधिकारी मिरज भाग मिरज आणि विटा नगरपरिषद, विटा नगरपरिषद हॉल दुसरा मजला, उपविभागीय अधिकारी खानापूर भाग विटा.

टप्पा क्रमांक २ मध्ये नगरपरिषदेच्या प्रभागांचे प्रारूप, प्रभागदर्शक नकाशे व सदस्य पदांच्या आरक्षणाची अधिसूचना कलम १० अनुसार मतदारांच्या माहितीसाठी व हरकती व सूचना सादर करण्यासाठी ५ जुल ते १४ जुल या कालावधीत कार्यालयीन वेळेत नगरपरिषद कार्यालयात मांडता येतील. या हरकती व सूचनांवर दि. १८ व १९ जुल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणी होणार आहे.