31 May 2020

News Flash

साताऱ्यात कोणता राजा बाजी मारणार?

साताऱ्यातील कोणतीही निवडणूक उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भोवतीच फिरते.

निवडणूक नगरपालिकेची पण संघर्ष दोन राजांमधील, हे चित्र सध्या साताऱ्यात पाहण्यास मिळत आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन राजांमधील आरोप-प्रत्यारोपांनी शहरातील वातावरण गढुळले आहे. दुसरीकडे या दोन राजांच्या भांडणामुळे भारतीय जनता पक्षाच्या वतीने उभा केलेला तिसरा पर्यायदेखील सध्या चर्चेत आला आहे.  साताऱ्यातील कोणतीही निवडणूक उदयनराजे आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या भोवतीच फिरते.

साताऱ्यामध्ये गेली दहा वर्षे पालिकेच्या राजकारणात या दोन्ही राजांचा ‘मनोमीलन’ घटक कार्यरत होता, परंतु हे मनोमिलन अगदीच वरवरचे आणि व्यवहारावर आधारित होते हे सध्याचा प्रचार पाहता उघड झाले आहे. या मनोमीलनाला पहिला सुरुंग हा नगराध्यक्षपदामुळे लागला आहे. सातारा नगरपालिकेचे नगराध्यक्षपद यंदा महिला खुल्या प्रवर्गासाठी राखीव आहे. त्यावर शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या पत्नी वेदांतिकाराजे यांचा दावा करत त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या उदयनराजे यांनी हे पद सर्वसामान्य व्यक्तीच्या हातात का नको? असा पवित्रा घेत राजकारणाशी संबंध नसलेल्या; सर्वसामान्य घरातील माधवी कदम यांना उमेदवारी दिली. ही उमेदवारी जाहीर करतानाच त्यांनी सगळी पदे छत्रपतींनी स्वत:च्याच घरात का ठेवायची? सामान्यांना संधी कधी द्यायची? अशी जनसामान्यांना साद घातली आहे. सध्या प्रचारात ते अत्यंत आक्रमक भाषेचा वापर करीत असून आपले उमेदवार निवडून न आल्यास खासदारकी सोडू, असा पवित्राही त्यांनी जाहीर केला आहे. त्यांच्याकडून पत्रकार परिषदा, सभांमध्ये शिवेद्रराजेंच्या ताब्यातील संस्थांमधील गैरव्यवहारावर हल्लाबोल करण्यात येत आहे. दुसरीकडे शिवेंद्रराजेंकडूनही उदयनराजेंच्या कार्यशैलीबद्दल प्रश्न उपस्थित करत भ्रष्टाचाराचे आरोप केले जात आहेत. शहरात रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी, कचरा व्यवस्थापन, शहर वाहतूक, शहर विकास आराखडा आदी प्रश्न गंभीर बनलेले असताना या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष होत सध्या दादागिरी, गुंडगिरी, टोलनाके, वाळू ठेके, सहकारी संस्था-कारखान्यातील भ्रष्टाचार यांचीच चर्चा सुरू आहे. दरम्यान, या दोन आघाडय़ांबरोबर भाजपही या निवडणुकीत उतरला असून त्यांनी विविध विकासकामांच्या मुद्दय़ांभोवती आपला प्रचार ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या सभेत या दोन राजांवरील टीकेस बगल देत भाजप काय करू इच्छिते यावर भर दिला. यंदा या दोन राजांमध्ये शक्तिशाली कोण, या बरोबरीनेच त्यांच्या भांडणात भाजप किती मजल मारतोय, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

पृथ्वीराजबाबांची प्रतिष्ठा पणाला

कराड पालिकेच्या निवडणुकीत यंदा प्रथमच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी लक्ष घातल्याने ती चुरशीची झाली आहे. इथे सत्तारूढ आमदार बाळासाहेब पाटील यांचा गट, काँग्रेस पुरस्कृत आघाडी, भाजप आणि एमआयएम या चार आघाडय़ांमध्ये लढत होत आहे. माजी मंत्री विलासकाका उंडाळकर यांनीही काही जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत. वाईमध्ये यंदा राष्ट्रवादी पुरस्कृत वाई तीर्थक्षेत्र आघाडी आणि त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजपा, रिपब्लिकन पक्षाने एकत्र येत वाई विकास महाआघाडी उभी केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 26, 2016 1:36 am

Web Title: municipal elections in satara
Next Stories
1 जयंत पाटील यांची बालेकिल्ल्यातच कोंडी!
2 भाजपची ‘स्मार्ट’ खेळी
3 नाव पक्षाचे, राजकारण मात्र आघाडय़ांचे!
Just Now!
X