अक्षरधारा आयोजित ५५६व्या मायमराठी शब्दोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते पार पडले. या वेळी ते म्हणाले, वाचनाची सवय प्रत्येक नागरिकाला उज्ज्वल दिशा दाखवते. त्यासाठी प्रत्येकाने भरपूर वाचन केले पाहिजे. अक्षरधारासारख्या संस्था गेली कित्येक वर्षे ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन आपल्या शहरात करीत आहे. असे उपक्रम गावोगावी राबविले गेले पाहिजेत. तब्बल ५५६ ग्रंथ प्रदर्शने राबवणाऱ्या या संस्थेच्या प्रदर्शनातून ग्रंथ खरेदी करून सावंतवाडी नगर परिषद वाचनालयाला ग्रंथभेट देणार आहे. सावंतवाडी शहरात अक्षरधारा संस्थेने आयोजित केलेल्या २०व्या आणि संपूर्ण महाराष्ट्रातील ५५६व्या ग्रंथ प्रदर्शनावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रा. अल्ताफ खान, प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक प्रवीण बांदेकर आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने बाळासाहेब बोर्डेकर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे प्रा. अल्ताफ खान म्हणाले की, अशा प्रकारच्या ग्रंथ प्रदर्शनामुळे नवीन वाचकवर्ग निर्माण होईल, तसेच आजच्या युवावर्गासाठी ठिकठिकाणी ग्रंथोत्सव होणे आवश्यक आहे. या प्रदर्शनासाठी अक्षरधाराचे कौतुक केले पाहिजे. आज युवावर्ग अशा प्रदर्शनामुळे वाचनाकडे ओढला जात आहे हे खूप महत्त्वाचे आहे. प्रमुख वक्ते प्रवीण बांदेकर म्हणाले, ‘गावोगावी पुस्तकांचे बिढार घेऊन जाणारी ही संस्था करीत असलेल्या कार्याची ओळख सर्व समाजाला व्हायला पाहिजे. या शब्दोत्सवाला प्रत्येक जाणत्या रसिक वाचकाने भेट देऊन ग्रंथ खरेदी केली पाहिजे.’ उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळासाहेब बोर्डेकर म्हणाले, ‘एखादी संस्था बाहेरगावाहून इतकी सारी पुस्तके घेऊन आपल्यासाठी इथे येते. ग्रंथांचा, शब्दांचा, भाषेचा उत्सव साजरा करते. शाळा, महाविद्यालये आणि समाजातील महत्त्वाच्या जाणकारांनी याची दखल घेतली पाहिजे. श्रीराम वाचन मंदिराचे कार्यवाह रमेश बोंद्रे नेहमीच अशा उत्तमोत्तम संस्थांची मदत करीत आले आहेत. वाचन मंदिरात हा शब्दोत्सव महिना अखेरीपर्यंत आहे. ग्रंथालये आणि विविध संस्थांनी हा शब्दांचा उत्सव अनुभवण्यासाठी एकदा तरी अवश्य भेट द्यावी.’ या मायमराठी शब्दोत्सवात ग्रंथप्रेमींसाठी १००० रुपये छापील किमतीच्या पुस्तक खरेदीवर २५० रुपयांची पुस्तके भेट, ही योजना राबवली जाणार आहे. शब्दोत्सवात पु. ल. देशपांडे, द. मा. मिरासदार, व. पु. काळे, प्रा. शिवाजीराव भोसले यांच्यासारख्या अनेक लोकप्रिय साहित्यिकांच्या सी.डी., डीव्हीडी, कॅलिग्राफिक बुकमार्क्‍सदेखील उपलब्ध आहेत.
मायमराठी शब्दोस्तवमध्ये राजहंस प्रकाशनचे ‘टाटायन’, सुरेश हावरे लिखित ‘उद्योग तुमचा पैसा दुसऱ्याचा’ या अल्पावधीत लोकप्रिय ठरलेल्या पुस्तकांवर विशेष सवलती दिल्या आहेत. डॉ. भालचंद्र नेमाडे लिखित ‘हिंदू’ आणि ‘टीका स्वयंवर’, संदीप घासलेकर लिखित ‘एका दिशेचा शोध’, सरश्री लिखित ‘अंतर्मनाच्या शक्तीपलीकडील अंतर्बळ’ आणि ‘विचारनियम’, डॉ. सदानंद मोरे यांचे ‘गर्जा महाराष्ट्र’, विश्वास पाटील लिखित ‘लस्ट फॉर लालबाग’, श्रीनिवास ठाणेकर यांचे ‘ही श्रींची इच्छा’ यांसारख्या अनेक लोकप्रिय नव्या, जुन्या पुस्तकांवर विशेष सवलती जाहीर केल्या आहेत. हा शब्दोत्सव २८ फेब्रुवारीपर्यंत सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत खुला राहणार आहे.