म्युरल कला म्हणजे काय, या कलेचा उपयोग कसा होऊ शकतो, हे कसे तयार करू शकतात, याविषयी येथील अहिरराव कलर लॅबमध्ये आयोजित नि:शुल्क कार्यशाळेत तज्ज्ञ भरत रावल व नंदिनी अहिरराव यांनी मार्गदर्शन केले. कार्यशाळेतील कलाकृतींचे प्रदर्शन शनिवारी दुपारी एक वाजता गंगापूर रोडवरील कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आले असून या प्रदर्शनाचे उद्घाटन भुजबळ नॉलेज सिटीच्या संचालक शेफाली भुजबळ यांच्या हस्ते होणार आहे.
कार्यशाळेत दहा दिवस म्युरल कलेची माहिती सहभागी झालेल्या ८० विद्यार्थ्यांना देण्यात आली. विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनातून त्यांना व्यावसायिक मंच उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रदर्शन भरविण्यात येत आहे. प्रदर्शनात विविध प्रकारच्या थ्रीडी म्युरल्स उपलब्ध राहतील. हे प्रदर्शन रविवारीही खुले राहणार आहे. कार्यशाळेत ज्यांना सहभाग घेता आला नाही त्यांच्यासाठी पुन्हा एकदा कार्यशाळा घेण्यात येणार आहे. इच्छुकांनी त्यासाठी रविवारी कुसुमाग्रज प्रतिष्ठान येथे नंदिनी अहिरराव यांच्याकडे नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.