कर्नाटक सीमेवरील चडचण (जि. विजापूर) येथे बेशुध्दावस्थेत आढळून आलेल्या शालेय मुलीवर बलात्कार करून नंतर तिला विषारी द्रव पाजण्यात आल्याचे पोलीस तपासात आढळून आल्याने मंगळवेढा पोलिसांनी राजेंद्र काशिनाथ देवपुरे (२३, रा. डोणज,    ता. मंगळवेढा) यास अटक करून त्याच्याविरूध्द मुलीचे अपहरण करून बलात्कार आणि खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
चडचण येथे १५ वर्षांची अल्पवयीन मुलगी व राजेंद्र देवपुरे असे दोघे विषारी औषध प्राशन केल्याच्या अवस्थेत आढळून आले होते. त्यांना सोलापूरच्या छत्रपती शिवाजी सवरेपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ती मुलगी बेशुध्द तर राजेंद्र हा शुध्दीवर होता. मात्र तो यासंदर्भात माहिती देत नव्हता. उपचाराअंती मुलगी शुध्दीवर आल्यानंतर पोलिसांनी तिचा जबाब घेतला तेव्हा पोलीसदेखील हादरले. डोणज (मंगळवेढा) येथे नववीच्या वर्गात शिक्षण घेणा-या सदर मुलीने दिलेल्या जबाबानुसार या गुन्ह्य़ाची माहिती अशी की, सदर मुलगी रात्री आपल्या घरासमोर झोपली असताना पहाटे राजेंद्र देवपुरे व त्याच्या साथीदाराने तिच्या तोंडावर कापड टाकून तिला उचलून मोटारसायकलवरून बळजबरीने चडचण येथे पळवून नेले. त्याठिकाणी राजेंद्र याने तिच्यावर बलात्कार केला. झालेली घटना आपल्या वडिलांना सांगते, असे म्हटल्यावर राजेंद्र याने तिला मारहाण करीत पिवळ्या रंगाचे विषारी द्रव तिच्या तोंडात घातले. नंतर काय घडले हे तिला समजले नाही.
सदर पीडित मुलीच्या फिर्यादीवरून मंगळवेढा पोलिसांनी राजेंद्र देवपुरे याच्यासह दोघांविरूध्द अल्पवयीन मुलीचे अपहरण करून बलात्कार करणे व नंतर तिच्या खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपासह बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी किशोर कारंडे हे पुढील तपास करीत आहेत.