राहुरी तालुक्यात तांदूळवाडी परिसरात एका गरीब शेतक-याच्या अंगावर वाळूतस्कराने टेम्पो घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तालुक्यात वाळूतस्करांनी धुमाकूळ घातला असून त्यांना रोखण्यात पोलिसांना अपयश आले आहे.
तांदूळवाडी शिवारात मुळा नदीपात्रात रामेश्वर मच्छिंद्र निकम व अण्णासाहेब दत्तात्रय निकम यांनी वाळूतस्करी करणा-यांना अडवले. तुम्ही आमच्या गाळपेर जमिनीत वाळू का भरता, असे म्हणताच तस्करांनी अण्णासाहेब निकम यांच्या अंगावर टेम्पो घातला. त्यात निकम हे गंभीर जखमी झाले. रामेश्वर निकम यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली असून पोलिसांनी काशिनाथ अंबादास चव्हाण, दत्तू अंबादास चव्हाण, विष्णू अंबादास चव्हाण यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाण आदी कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राहुरी तहसील कार्यालयाच्या परिसरात वाळूतस्करांचा अड्डा आहे. पोलीस व महसूल खात्याच्या कर्मचा-यांशी त्यांचे साटेलोटे आहे. त्यामुळे तस्करांवर कारवाई होत नाही. प्रवरा नदीपात्रात लाख येथे तलाठी कार्यालयासमोर वाळू भरली जाते. देवळाली प्रवरा पोलीस चौकीतील कर्मचा-यांनी वाळू भरणारे ट्रॅक्टर पकडले, पण चिरीमिरी देऊन त्यांची सुटका करण्यात आली. या प्रकरणात मोठी लाचखोरी झाली आहे त्याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मुळा व प्रवरा नदीपात्रातून होणा-या वाळूतस्करीकडे पोलीस दुर्लक्ष करीत आहेत. तस्करांकडून वसुली करण्याकरिता झिरो पोलीस तैनात करण्यात आले आहेत.