जावयाने केलेल्या हल्ल्यात सासू आणि मेहुणी हे दोघे जागीच ठार झाले आहेत. या हल्ल्यात पत्नी आणि मेहुणा गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, त्यांचीही प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते. कोल्हापुरात शनिवारी पहाटेच्या सुमारास शिरोळ तालुक्यातील यड्राव येथे ही घटना घडली.

या प्रकरणी संशयित आरोपी प्रदीप विश्वनाथ जगताप हा फरारी असून पोलिसांनी तपासासाठी पथके रवाना केली आहेत. कौटुंबिक वादातून ही घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या हल्ल्यात सासू छाया श्रीपती धुमाळ व मेहुणी सोनाली अभिषेक रावण यांचा मृत्यू झाला. पत्नी रुपाली प्रदीप जगताप व मेहुणा रोहित श्रीपती धुमाळ हे जखमी झाले होते ज्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे एकाच कुटुंबातील चौघांची हत्या झाल्याचे समोर आले आहे.

प्रदीप जगताप हा मूळचा सांगली जिल्ह्यातील कवठे गुलंद गावचा आहे. इचलकरंजी पासून पाच किमी अंतरावर असलेल्या यद्राव गावात औद्योगिक वसाहत आहे.तेथील एका कापड प्रक्रिया गृहात(प्रोसेसर्स) तो काम करत होता. या गावातील शिरगाव चाळ येथे तो एकत्र राहात होता. त्याचे पत्नीसह कुटुंबियांशी सतत वाद होत असत. पहाटे त्याने घरात प्रवेश करून वाद घातला. सोबत आणनेल्या यंत्रमागाच्या लाकडी माऱ्याने त्याने बेधुंद मारहाण सुरू केली. त्याच्या या हल्ल्यात दोघे ठार झाले तर दोघे गंभीर जखमी झाले.

घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे व उपअधीक्षक धीरज पाटील यांनी भेट देऊन तपासाच्या सूचना केल्या. पहाटे तीन वाजता हा प्रकार घडला पण आज सकाळी तो शेजारच्या लोकांच्या लक्षात आला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली.