एकतर्फी प्रेमातून भाचरवाडी (ता. पन्हाळा ) येथे एकाचा गोळी झाडून खून करण्यात आला. सूर्यदीप राजाराम पाटील (वय २६, रा.कोलोली ता. पन्हाळा ) असे गोळीबारात ठार झालेल्या युवकाचे नाव आहे. पोपट श्रीपती गायकवाड (वय ४५, रा. भाचारावाडी ) याने सूर्यदीपवर आपल्या बंदुकीतून गोळी झाडली. याप्रकरणी पन्हाळा पोलिसांनी शनिवारी पोपटला  मदत केल्याची तक्रार फिर्यादीमध्ये नोंदवण्यात आल्याने वडील श्रीपती दादू गायकवाड, आई रंगुबाई व पत्नी शोभा या तिघांना अटक केली. न्यायालयाने या तिघांना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.  गोळीबारानंतर  पोपट गायकवाड फरारी झाला असून त्याच्या तपासासाठी पोलिसांची ३ पथके रवाना झाली असल्याची माहिती पन्हाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वाय.एन. गवारे यांनी दिली.
भाचरवाडी (रा.पन्हाळा) येथील अश्विनी नावाच्या मुलीशी सूर्यदीप (रा. कोलोली, ता. पन्हाळा ) याचा गेल्या वर्षी ३१ जुल रोजी विवाह झाला होता. लग्नापूर्वी त्याच गावातील पोपट गायकवाड याने अश्विनीला मागणी घातली होती. पोपट विवाहित असून त्याला दोन मुले असल्याने अश्विनीचे वडील रामचंद्र ज्ञानू गायकवाड यांनी या विवाहास नकार दिला होता. यामुळे पोपट वारंवार अश्विनीला व तिच्या घरच्यांना त्रास देत होता. तसेच अश्विनीच्या पतीलाही तो वारंवार धमकावत होता. पोपट साखर व्यापारी असून त्याचे शाहूपुरीत साखरेचे दुकान होते. सध्या त्याचे उचगाव येथे साखरेचे दुकान आहे.
सहा महिन्यांपूर्वी पोपटने सूर्यदीपला कोल्हापुरात बंदुकीचा धाक दाखवून धमकावले होते. यावेळी सूर्यदीपने लक्ष्मीपुरी पोलिसात फिर्याद दिली होती. त्याच्या फिर्यादीवरून पोलिसांनी त्याची बंदूक जप्त केली होती. सध्या अश्विनी गरोदर असल्याने तिच्या वडिलांनी गुरुवारी तिला कोल्हापुरातील रुग्णालयात दाखवून घरी नेले होते. शुक्रवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पोपट अश्विनीच्या घरी गेला. तो अश्विनीला जबरदस्तीने त्याच्या घरी घेऊन चालला होता. अश्विनीच्या वडिलांनी त्याला विरोध केला. यावेळी त्याने त्यांना मारहाण केली. वडिलांनी ही माहिती सूर्यदीपला सांगितली. सूर्यदीप याचा जाब विचारण्यासाठी पोपटच्या घरी गेला. यावेळी रागातून पोपटने सूर्यदीपवर बंदुकीतून गोळी झाडली. यात त्याच्या डाव्या बाजूला छातीवरच गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल करण्यात आले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. सीपीआरमध्ये सूर्यदीपच्या नातेवाईकांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. घटनेची संवेदनशीलता ओळखून सीपीआरमध्ये पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी होता. दरम्यान याप्रकरणी दाखल झालेल्या फिर्यादीनुसार पन्हाळा पोलिसांनी आरोपी पोपट याचे आई-वडील व पत्नी या तिघांना शनिवारी अटक केली.