शहरातील कल्याण रस्त्यावर झालेल्या अनोळखी व्यक्तीच्या खुनाचा तपास नगर तालुका पोलिसांनी उलगडला. या गुन्ह्य़ात मित्रानेच तत्कालीन कारणातून तरुणाचा खून केल्याचे पोलीस तपासात आढळले. मित्राला अटक करण्यात आली असून त्याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश आज, शनिवारी न्यायालयाने दिला. मृतदेहाची डिएनए चाचणी करून ओळख पटवण्यात आली होती.

जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांनी ही माहिती दिली. अतिरिक्त अधीक्षक सागर पाटील, उपअधीक्षक अजित पाटील या वेळी उपस्थित होते. तपासी अधिकारी तथा नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक शंकरसिंग राजपुत व त्यांच्या पथकातील उपनिरीक्षक रितेश राऊत व धनराज जारवाल, हवालदार बापुसाहेब फोलाने, रावसाहेब खेडकर, अशोक मरकड, राहुल शिंदे, बाळु कदम यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

रघुनाथ एकनाथ बर्डे (रा. नालेगाव, नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे तर मच्छिंद्र बाबुराव म्हस्के (४८, रा. बुरुडगाव रस्ता, नगर) याला अटक करण्यात आली आहे.

त्याने खुनाची कबुली दिली आहे. खून करताना म्हस्के याच्या समवेत आणखी कोणी साथीदार होता का, याचा तपास पोलीस करत आहेत. म्हस्के याला सहा दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

डीएनए तंत्राने ओळख पटवली

डीएनए चाचणीच्या आधारे मृतदेहाची ओळख पटवण्यात आली. तो रघुनाथ बर्डे याचा होता व तो नंदाचा पती असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपासात मच्छिंद्र म्हस्के हा रघुनाथ बर्डे याच्या समवेत नेप्ती शिवारात होता, याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने पोलिसांकडे खुनाची कबुली दिली. म्हस्के व बर्डे हे दोघेही रोजंदारीवरील कामगार होते. दोघांनाही दारूचे व्यसन होते. अनेक वर्षांपासून दोघे एकत्र दारू पित. दि. १८ एप्रिलला दोघांनी नेप्तीच्या पुलाखाली एकत्र दारू प्यायली त्यातून झालेल्या वादात रघुनाथ बर्डे याची लाथ म्हस्के याला लागली, त्याच वादातून म्हस्के याने बर्डे याचा गळा दाबून खून केला. याची कबुली त्याने दिल्याची माहिती तपासी अधिकारी राजपुत यांनी दिली.