News Flash

एकतर्फी प्रेमातून तरुणीची भररस्त्यात हत्या

अमरावतीत थरकाप उडवणारी घटना

(संग्रहित छायाचित्र)

एकतर्फी प्रेमातून माथेफिरू तरुणाने एका युवतीची भररस्त्यात चाकूने वार करून निर्घृण हत्या केली. अमरावतीतील मुधोळकर पेठ परिसरात आज मंगळवारी दुपारी ही थरकाप  उडवणारी घटना घडली. परिसरातील लोकांनी हत्या करणाऱ्या युवकाला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

अर्पिता दत्तात्रय ठाकरे (१९, रा. कवठा बहाळे) असे मृत युवतीचे नाव आहे. अर्पिता ही भारतीय महाविद्यालयात बी.कॉम. प्रथम वर्षांला शिकत होती. आज दुपारी गावाला परत जाण्यासाठी अर्पिता तिच्या मैत्रिणीसह राजापेठ बसस्थानकाकडे जात असताना आरोपी तुषार किरण मस्करे (२०, रा. मलकापूर) याने अर्पिताचा पाठलाग करून तिला गाठले. आरोपीने तिच्या पोटावर तसेच गळ्यावर धारदार चाकूने वार केले. बचाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अर्पिताच्या मैत्रिणीवरही त्याने हल्ला केला आणि तेथून पळ काढला. ही घटना परिसरातील काही लोकांनी पाहिल्यानंतर त्यांनी आरोपीचा पाठलाग करून त्याला पकडले आणि चांगलाच चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या अर्पिताला येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण अतिरक्तस्रावाने उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला. अर्पिताच्या जखमी मैत्रिणीवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तुषार मस्करे याचे अर्पितावर गेल्या अनेक महिन्यांपासून एकतर्फी प्रेम होते. तो तिचा दररोज पाठलाग करीत होता. मात्र, अर्पिता त्याला दाद देत नव्हती. याप्रकरणी अर्पिताच्या कुटुंबीयांनी तुषारच्या विरोधात बडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दिली होती. यावेळी तुषारने पोलिसांसमारे आपण अर्पिताला भेटणार नाही किंवा तिची छेड काढणार नाही, अशी ग्वाही लेखी स्वरूपात दिली होती. पोलिसांनी त्याला समज देऊन सोडून दिले होते. मात्र, आज दुपारी तुषारने वेश बदलून तोंडाला रुमाल बांधून अर्पिताचा पाठलाग केला आणि तिच्यावर हल्ला केला.

या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्यानंतर नागरिकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. शहरातील कायदा व सुव्यवस्था ढासळत चालल्यामुळे पोलिसांच्या विरोधात रोष व्यक्त करण्यात आला. या घटनेने सुमारे दीड वर्षांपूर्वी साईनगर परिसरात प्रतीक्षा मेहत्रे या  युवतीच्या हत्या प्रकरणाच्या थरारक आठवणी जाग्या केल्या. २३ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रतीक्षा तिच्या मैत्रिणीसोबत जात असताना एकतर्फी प्रेम करणाऱ्या तरुणाने तिची चाकूने वार करून अशाच पद्धतीने भररस्त्यात हत्या केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 10, 2019 1:54 am

Web Title: murder of a woman in love with one sided love abn 97
Next Stories
1 तिवरे दुर्घटनेमुळे शिवसेनेपुढे अनपेक्षित राजकीय आव्हान
2 जळगावचा विकास कागदावरच; भाजपची कोंडी
3 अ.भा.साहित्य संमेलन: उस्मानाबादचा मार्ग सुकर
Just Now!
X