वाई:सुट्टीवर आलेल्या जवानाचा मारहाण करून खून केल्याप्रकरणी पत्नी, भावजय आणि मेहुणा यांना सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली. संदीप जयसिंग पवार (सैदापूर ता. सातारा) हा भारतीय सैन्यदलातील जवान सुट्टीवर घरी आलेला असताना दारू पिऊन मारहाण करून व त्रास देत होता. त्रासाला कंटाळून त्याला पत्नी भावजय व मेहुण्याने दि २७ डिसेंबर रोजी लाकडी दांडक्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. उपचारांसाठी पुणे येथील लष्करी रुग्णालयात दाखल केले.उपचार सुरू असताना जवानाचा दि. ३१ डिसेंबर रोजी मृत्यू झाला. अज्ञातांनी मारहाण करून खून केल्याची तक्रार वानवडी पुणे पोलिसात नातेवाईकांनी केली होती. गुन्हा दाखल करून सातारा मुख्यालयात वर्ग करण्यात आला होता.

या प्रकरणी गावामध्ये व परिसरात उलटसुलट चर्चा होत होती. पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांना ही माहिती समजल्यानंतर त्यांनी या बाबत सखोल चौकशीचे आदेश दिले. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे सहाय्यक निरीक्षक रमेश गर्जे घरी जाऊन चौकशी करत असताना सुरवातीला कुटुंबीयांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. विश्वासात घेऊन चौकशी करत असताना जवानाला मारहाण करून खून केल्याचा प्रकार उघडकीस आला. कुणालाही संशय येऊ नये म्हणून सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल न करता पुणे येथे दाखल केले व वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञाताने मारहाण करून खून केल्याचा खोटा गुन्हा दाखल केला अशी कबुली नातेवाईकांनी दिली.

हा खून मृत सैनिकाची पत्नी, भावजय आणि मेहुण्याने केला असल्याचे तपासात समोर आले आहे. सुट्टीला गावी आल्यानंतर दारू पिऊन त्रास देत असल्याने खून केल्याची कबुली संशयितांनी पोलिसांजवळ दिली आहे.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस अंमलदार जोतिराम बर्गे, हवालदार अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर, गणेश कापरे, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, चालक पोलिस नाईक संजय जाधव यांनी सहभाग घेतला.