येथील मसाला व्यापारी नितीन सुधाकर हिंगासपुरे (३४) यांची अज्ञात मारेकऱ्यांनी शस्त्रांनी वार करून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. बडनेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कोंडेश्वर ते अंजनगाव बारी मार्गावरील चंद्रापूर जंगलात त्यांचा मृतदेह आढळून आला. हत्येचे कारण लगेच कळू शकले नसले, तरी या हत्या प्रकरणाला अनैतिक संबंधांची किनार आहे का, याची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
नितीन हिंगासपुरे हे जुन्या बायपास मार्गावरील नंदनवन कॉलनीत रहात होते. अविवाहित असलेल्या नितीनचा मसाला विक्रीचा व्यवसाय होता. सोमवारी ते घरून पायीच बाहेर पडले होते. नंतर त्यांचा मृतदेहच आढळून आला. मारेकऱ्यांनी शस्त्रांनी वार करून आणि गळा आवळून त्यांची हत्या केली आणि नंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने चादरीत त्यांचा मृतदेह गुंडाळून जंगलात फेकून देण्यात आला. पोलिसांनी या हत्या प्रकरणात तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्यात नितीनच्या चुलतभावासह त्याच्या दोन मित्रांचा समावेश आहे. नितीनजवळ सहा सीमकार्ड आढळून आले आहेत. त्याच्या हातावर एका महिलेचे नाव गोंदलेले होते. पोलीस सर्व अंगांनी तपास करीत आहेत.
चंद्रापूर जंगलात वनमजूर रतन सुरजुसे हे गस्तीवर असताना त्यांच्या सोबतचा कुत्रा हा नाल्याच्या काठापर्यंत धावत गेला. त्या ठिकाणी एका चादरीत मृतदेह होता. या घटनेची माहिती सुरजुसे यांनी वनरक्षक किरण घाडेकर यांना दिली. त्यानंतर बडनेरा पोलिसांना या प्रकरणाची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. मृतदेह चादरीत गुंडाळून ठेवण्यात आला होता. नितीनच्या डोक्यावर वार करण्यात आले होते. गळा आवळण्याचेही व्रण होते. बाजुला कारच्या टायर्सचे निशाण दिसले. त्यावरून मारेकऱ्यांनी अन्यत्र नितीनची हत्या करून या ठिकाणी कारमधून मृतदेह फेकून दिला असावा, असा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांना नितीनच्या पॅन्टच्या खिशात दोन मोबाईल, पैशांचे पाकीट आणि सहा सीमकार्ड आढळून आले. मोबाईलवर शेवटचा आलेला कॉल हा एका महिलेचा होता. पोलिसांनी त्यादृष्टीने तपास सुरू केला आहे.