दीड लाखाच्या खंडणीसाठी ९ महिन्यांच्या चिमुकलीचा व तिच्यासोबत असलेल्या ८ वर्षांच्या बालिकेचाही निर्घृण खून करण्यात आला. या प्रकारामुळे भोकरदन तालुक्यात मोठी खळबळ उडाली. भोकरदन तालुक्यातील वालसावंगी गावात घडलेल्या या घटनेतील चिमुकलीचा मृतदेह गेल्या सोमवारी गावातील एका स्नानगृहात सापडला, तर ८ वर्षांच्या मुलीचा मृतदेह बुधवारी गावच्या शिवारातील विहिरीत सापडला. या दुहेरी खूनप्रकरणी पोलिसांनी तरुण, तरुणी व दाम्पत्यास अटक केली. त्यांना २४पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
वालसावंगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य अधिकारी डॉ. अनिल वाघमारे यांच्या पायल या ९ महिन्यांच्या चिमुकलीस घेऊन लक्ष्मी सोनुने (वय ८) गेल्या सोमवारी सकाळी बाहेर गेली. त्यानंतर डॉ. वाघमारे यांच्या पत्नीस भ्रमणध्वनीवरून एका महिलेने आपली मुलगी सुरक्षित हवी असेल, तर दीड लाख रुपये द्या असे कळविले. शोधाशोध केली असता पायलचा मृतदेह गावातच ग्रामपंचायत सदस्य विजय गवळी याच्या घरामागील स्नानगृहात सापडला. ज्या मोबाइलवर डॉ. वाघमारे यांच्या पत्नीस संपर्क साधला होता, त्यावरून गावातील आणखी कोणाशी बोलणे झाले, याबाबतचा तपशील पोलिसांनी मिळविला. तेव्हा त्या मोबाइलवरून कल्पना पवार ही गावातीलच संदीप नेव्हरे याच्याशी संपर्क साधत होती, असे आढळले.
पोलिसांनी कल्पना पवारला अटक केल्यावर ८ वर्षांच्या लक्ष्मी या मुलीस गावाजवळील विहिरीत टाकून दिल्याचे निष्पन्न झाले. कमरेस दगड बांधलेला लक्ष्मीचा मृतदेह पोलिसांच्या उपस्थितीत विहिरीतून बाहेर काढण्यात आला. आधी पायलचा खून करून नंतर त्याची वाच्यता होऊ नये, यासाठी लक्ष्मीचा खून केला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. पोलिसांनी कल्पना पवार व संदीप नेव्हरे या दोघांना अटक केली. पायलचा मृतदेह ज्याच्या घरामागील स्नानगृहात सापडला होता, तो विजय गवळी व त्याच्या पत्नीसही अटक केली. न्यायालयाने गवळी दाम्पत्यास २४ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.