मद्यधुंद अवस्थेत पत्नीच्या पोटात सुरा खुपसून तिची निर्घृण हत्या केल्याची घटना रत्नागिरी शहराजवळील पोमेंडी बुद्रुक येथे शनिवारी सायंकाळी घडली. यामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी संशयित पती लक्ष्मण जोशी याला ताब्यात घेतले आहे.
रत्नागिरी ग्रामीण पोलिसांच्या माहितीनुसार, पोमेंडी बुद्रुक येथे मीनाक्षी लक्ष्मण जोशी (६०) ही महिला आपला पती लक्ष्मण जोशीसह राहायची. पतीला दारूचे व्यसन होते. त्यामुळे त्यांच्यात किरकोळ बाबींवरून खटके उडायचे. मीनाक्षी या मुंबई-डोंबिवली येथील एका माध्यमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून सेवेत होत्या. सेवानिवृत्तीनंतर त्या पोमेंडी बुद्रुक येथे राहावयास आल्या. त्यांचा पती लक्ष्मण जोशी हेही बँकेतील सेवेतून निवृत्त झाले होते.
शनिवारी (२ फेब्रुवारी) सायंकाळी सुमारे ७.३० वा. लक्ष्मण जोशीने पत्नी मीनाक्षीवर सुऱ्याचे सपासप वार केले. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या. त्यांची किंकाळी ऐकून आजूबाजूचे लोक धावत आले. रक्ताच्या थारोळ्यात आणि गंभीर अवस्थेत त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तेथील डॉक्टरांनी त्या मृत असल्याचे घोषित केले.
पोलीस पाटील श्रीमती शिंदे यांनी रत्नागिरी ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या प्रकरणी चौकशीसाठी लक्ष्मण जोशीला ताब्यात घेतले आहे.