नगर: माजी प्राचार्य, संगीताचे तसेच संस्कृत, अर्धमागधी, पाली, मराठी या भाषांचे अभ्यासक, ज्येष्ठ संवादिनी व ऑर्गन वादक, नगर शहरात संगीत व सांस्कृतिक चळवळ रुजवण्यासाठी पुढाकार घेणारे डॉ. मधुसूदन नागेश बोपर्डीकर यांचे आज, रविवारी सकाळी कोविडमुळे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. ते ८६ वर्षांंचे होते. त्यांच्या मागे पत्नी, मुलगा, सून व नातू असा परिवार आहे.

राज्य सरकारचा ‘कालिदास पुरस्कार’ डॉ. बोपर्डीकर यांना प्राप्त झाला होता. त्यांची संस्कृत, संगीत, तत्त्वज्ञान, अध्यात्म, काव्यविषयक ५० हून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मूळचे वाई (सातारा) येथील असलेले बोपर्डीकर पुढे शिक्षण व नोकरीसाठी नगरला आले .

पंढरपूर व अहमदनगर महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केल्यानंतर ते हिंद सेवा मंडळाच्या  पेमराज सारडा महाविद्यालयात रुजू झाल्यावर. तेथे नऊ वर्षे त्यांनी प्राध्यापक व नंतर १२ वर्षे प्राचार्य म्हणून काम पाहिले.

संवादिनी व ऑर्गन वादनासाठी त्यांची ख्याती होती. माणिक वर्मा, भार्गवराम आचरेकर, छोटा गंधर्व, पंडितराव नगरकर, पं. पद्माकर कुलकर्णी, अजय पोहनकर यांना त्यांनी साथसंगत केली. ‘संगीत कान्होपात्रा’ नाटकासाठी त्यांनी महाराष्ट्रातील दौऱ्यात ऑर्गनची साथ केली. पारनेरकर महाराजांच्या पूर्णवाद तत्त्वज्ञानाला अनुसरून त्यांनी नवीन राग निर्माण केले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ६७ गुजराती कवितांचे त्यांनी संस्कृतमध्ये रूपांतर केले. ‘स्वर्गधरेची मोहक कन्या’ (५ मराठी संगीतिका), ‘खिडक्या’, ‘उघडली प्रकाश कवडे’, ‘अमृतानुभव’, ‘गीतगोविंद’ आदी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. सनातन धर्म सभेच्या ‘गुंजारव’ या संस्कृत मासिकाचे ते संपादक होते. त्याचबरोबर त्यांनी संस्कृत संवर्धन त्रमासिकही चालवले. बोपर्डीकर यांना विविध संस्थांनी पुरस्कार देऊन गौरवले होते.