चित्रपटसृष्टीमध्ये ४५ वर्ष सतत कार्यरत असणारे सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहरी यांनी आजवर आपल्या नावावर अनेक रेकॉर्ड्स नोंदविले आहेत. आतापर्यंत हिंदी चित्रपटसृष्टीत वावर असणारे बप्पी लहरी पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत असून त्यांनी लकी या चित्रपटासाठी आपला आवाज दिला आहे.

संजय जाधव दिग्दर्शित लकी या चित्रपटातील एक गाणं बप्पी लहरी यांनी गायलं असून पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या गाण्याचं रेकॉर्डींग पूर्ण झालं आहे. या गाण्याला अमितराजने संगीतबध्द केले आहे. तर बप्पीदांसोबत पार्श्वगायिका वैशाली सामंतने हे गाणे गायले आहे.

‘ मला हिंदी चित्रपटसृष्टीसोबतच मराठी चित्रपटसृष्टी आणि मराठी माणसांसोबत काम करायला आवडतं. मी माझ्या करिअरची सुरुवात हिंदी चित्रपटसृष्टीपासून केली. मात्र मला खरी ओळख एका मराठी माणसामुळे मिळाली. राजा ठाकूर यांच्या १९७५ साली प्रदर्शित झालेल्या ‘जखमी’ या चित्रपटामुळे मला खरी ओळख मिळाली, असं बप्पी लहरी म्हणाले.

पुढे ते असंही म्हणाले, ‘मराठीत काम करण्याची खुप इच्छा असूनही व्यस्त कामकाजामुळे मला मराठी चित्रपटसृष्टीकडे वळता आलं नाही. तरीही १९९० ला ‘डोक्याला ताप नाही’ सिनेमासाठी मी संगीत दिग्दर्शन केले होते. पण नंतर मराठीत काम करण्याची संधीच आली नाही. आता संजय जाधवच्या चित्रपटामुळे मी मराठीत परत येऊ शकलो.

‘बी लाइव्ह प्रोडक्शन्स’ आणि ‘ड्रिंमींग ट्वेंटीफोर सेव्हन’ निर्मित, संजय कुकरेजा, सुरज सिंग आणि दिपक पांडुरंग राणे ह्यांची निर्मिती असलेला, संजय जाधव दिगदर्शित ‘लकी’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.