कुष्ठरुग्ण, अंध, अपंग, मूकबधिर, आदिवासी कलावंतांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘आनंदवन’तर्फे सात जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता स्वरानंदवन मैफलीचे येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आयोजन करण्यात आले आहे. या मैफलीच्या माध्यमातून प्राप्त होणाऱ्या देणगीतून समाजातील गरजू घटक, आरोग्य सेवा तसेच अंध, अपंग, मूकबधिर आणि आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा पुरविणे, संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत आदी कामे करण्यात येणार आहेत.
याबाबतची माहिती पत्रकार परिषदेत स्वरानंदवन संयोजक समिती व कौत्सुभ आमटे यांनी दिली. रस्त्याच्या कडेला मरणासन्न अवस्थेत पडलेल्या एका महारोग्यावर स्वत: उपचार करून बाबा आमटे यांनी सेवाव्रताचा प्रारंभ केला होता. आज त्या सेवेचे रोपटे एका महावृक्षात परिवर्तित झाले आहे. या त्यांच्या कार्यात अनेक दानशूर व्यक्ती, स्वयंसेवक यांचा सक्रिय सहभाग आहे. शारीरिक व मानसिकरीत्या अपंग व्यक्तींना आपल्या अपंगत्वावर मात करण्यास आनंदवनने मदत केली आहे. त्यासाठी मदतीचे शेकडो हात पुढे आले. बाबा आमटे यांचे कार्य त्याच गतीने आणि नेटाने पुढे नेण्यासाठी त्यांचे पुत्र डॉ. प्रकाश व डॉ. विकास आमटे, तसेच नवीन पिढीही त्याच समर्पित भावनेने पुढे सरसावली आहे. त्यांच्या कार्याचा एक भाग म्हणून स्वरानंदवनची संकल्पना पुढे आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
महारोगी सेवा समितीचे मानद सचिव डॉ. विकास आमटे यांच्या संकल्पनेतून ‘स्वरानंदवन’ कलाविष्कार साकारला आहे. ज्यात शंभरहून अधिक कुष्ठरुग्ण, अंध, अपंग, मूकबधिर, आदिवासी कलावंत आपली कला सादर करतात. गीत, संगीत व नृत्य असे या सांस्कृतिक कार्यक्रमाचे स्वरूप आहे. स्वरानंदवन हा केवळ वाद्यांची तार छेडणारा वाद्यवृंद नव्हे तर, तो रसिकांच्या ह्रदयाची तार छेडणारा एक प्रेरक अनुभव आहे. संगीत, नृत्य आणि निवेदनाच्या आनंदाबरोबरच रसिकांना स्वत:च संवेदना जाणून घेण्याची संधी या माध्यमातून मिळते, असा विश्वास संयोजकांनी व्यक्त केला. या निमित्ताने आनंदवनातील आशावादी आणि मेहनती माणसे, त्यांची निकोप जीवनशैली, त्यांची जिद्द यांचे दर्शन घडते. थोडक्यात स्वरानंदवन म्हणजे पीडित बांधवांनी स्वत:साठी व सन्मानाने जगण्यासाठी उत्पन्नाचे निर्माण केलेले साधन होय. रोगावर उपचार करून त्यापासून मुक्ती मिळविणे आणि रोगमुक्त झालेला माणूस स्वावलंबी होऊन समाजाचा एक उपयुक्त घटक झालेल्या बघण्याचे बाबांचे स्वप्न होते. स्वरानंदवन प्रवृत्ती त्याच स्वप्नाला सत्यात उतरवू पाहत आहे.
कार्यक्रमाच्या माध्यमातून संकलित निधीद्वारे स्वरानंदवनमधील कलाकारांबरोबर समाजातील पीडित, शारीरिक व्याधींनी ग्रासलेल्या हजारो बांधवांना मदतीचा हात दिला जाणार आहे. त्यासाठी नाशिककरांच्या उत्स्फूर्त सहभागाची आवश्यकता असल्याची भावना संयोजकांनी व्यक्त केली. इच्छुक नागरिक, रसिक प्रेक्षक आणि देणगीदारांनी आपल्या मदतीचे धनादेश    ैेंँं१ॠ्र २ी६ं २ं्रे३्र, ६ं११ं’   या नांवाने काढावेत, असे आवाहन संयोजकांनी केले आहे. या संदर्भात अधिक माहितीसाठी अॅड. क्षमा सांगमुळी ९८९०१५८६८७, कीर्ती शाह ९८२२७ ४९७५३, सचिन टिपाले ९८२२२ ६४२३३ या क्रमांकावर संपर्क साधावा.