शेतमालाला दीडपट हमीभाव, कृषीपंप विजबिल माफी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी यांसारख्या अनेक मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली लाखो शेतकरी मुंबईच्या आझाद मैदानावर दाखल झालेले आहेत. मात्र ६ मार्चपासून नाशिकहून निघालेला हा शेतकरी मोर्चाचा प्रवास सोप्पा नक्कीच नव्हता. मजल-दरमजल करत रात्री जवळच्या गावात विश्रांती घेत, शेतात राबणारा अन्नदाता शेतकरी आपल्या मागण्यांसाठी मुंबईच्या दिशेने कूच होत होता.

मुंबईत दाखल झाल्यानंतर मुंबईकरांनीही शेतकरी बांधवाचं मोठ्या मनाने स्वागत केलं आहे. ज्या मागणीसाठी शेतकरी लढत आहेत, त्यात आपलाही हातभार लावावा यासाठी जागोजागी मुंबईतल्या सामाजिक संस्था पुढे सरसावताना दिसत आहेत. काल रात्री सोमय्या मैदानातून आझाद मैदानाकडे जाताना मोहम्मद अली रोडवर शेतकरी बांधवांना मुंबईकरांच्या पाहुणचाराची प्रचिती आली. मोहम्मद अली रोडवर काही स्थानिक मुस्लीम समाजातील लोकांनी शेतकरी बांधवांसाठी केळी, खाण्याचं सामान, पाणी यांसारख्या मुलभूत गोष्टींची सोय केली होती. आमच्या अन्नदात्याच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी हा सोपा मार्ग असल्याचं सांगत मुंबईत अनेक समुदायांनी शेतकरी बांधवांचं स्वागत केलं. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय, ज्याला नेटीझन्सनीही चांगली पसंती दिली.

नाशिक ते मुंबई प्रवासादरम्यान अनेक शेतकरी बांधवांच्या पायाला दुखापत झाली. मात्र अनवाणी पायाने चालत असताना दुखापतींचा विचार न करता आपल्या मागण्यांसाठी शेतकरी बांधव मुंबईकडे मार्गक्रमण करत राहिला. अशा काही शेतकऱ्यांना तातडीने मदत उपलब्ध व्हावी यासाठी काल रात्री विशेष मेडीकल कॅम्पचंही आयोजन करण्यात आलं होतं.

नाशिक ते मुंबई पायी प्रवास केल्यानंतर दमलेल्या शेतकऱ्यांवर उपचार करण्यात आले

 

प्रत्येक शेतकऱ्यांसाठी औषधांचीही व्यवस्था करण्यात आली होती

कोणत्याही सामाजिक प्रश्नांमध्ये मुंबईकर आपली जात-पात, धर्म विसरुन रस्त्यावर उतरतो हे या घटनेने पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. आज अधिवेशनादरम्यान शेतकरी बांधव विधानसभेला घेराव घालण्याचीही शक्यता आहे. शेतकऱ्यांच्या मागणीवर तोडगा काढण्यासाठी सरकारने काल एका समितीची स्थापना केली आहे. त्यामुळे आपल्या रास्त मागण्यांसाठी रस्त्यावर उतरलेल्या शेतकऱ्यांसाठी सरकार काय पावलं उचलतं हे पाहणं आता औत्सुक्याचं ठरणार आहे.