हर्षद कशाळकर

माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा पहिला टप्पा पूर्ण होत आला असला तरी रायगड जिल्ह्यातील तीन लाखहून अधिक कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण होऊ शकलेले नाही, शिक्षकांनी या कामात सहकार्य करण्यास दिलेला नकार, स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतींची उदासीनता अपुरे मनुष्यबळ यामुळे सर्वेक्षणाचे काम धिम्या गतीने सुरू असल्याचे दिसून येत आहे.

करोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन राज्य सरकारने माझे कुटुंब माझी जबाबदारी हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. घरोघरी जाऊन करोनाबाधितांचा शोध घेणे आणि त्यांच्यावर तातडीने उपचार करणे हा या योजनेमागचा उद्देश आहे. मात्र या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या अंमलबजावणीत अनेक अडचणी येत आहेत. शिक्षक संघटनांनी या कामात सहकार्य करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे आशासेविका आणि आरोग्यसेवकांच्या मदतीने ही योजना राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायती आणि नगरपालिकांकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्यानेही सर्वेक्षणाच्या कामात अडचणी निर्माण होत आहेत. अनेक सर्वेक्षणाचा पहिला टप्पा संपत आला असला तरी तीन लाखहून अधिक कुटुंबापर्यंत सर्वेक्षण पथके अद्याप पोहोचू शकलेली नाहीत.

रायगड जिल्ह्यात ७ लाख ६३ हजार ०९२ कुटुंबे आहेत. यापैकी ४ लाख ७३ हजार कुटुंबांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे, तर जवळपास ३ लाख कुटुंबाचे सर्वेक्षण अद्याप शिल्लक आहे, ८३९ पथकांच्या माध्यमातून हे सर्वेक्षणाचे काम करण्यात येत आहे.  १ हजार ६९४ जणांमध्ये तापाची लक्षणे आढळून आली आहेत, तर ७१९ जणांमधील प्राणवायूची पातळी कमी असल्याचे आढळून आले आहे. या सर्वाना पुढील आरोग्य तपासणीसाठी शासकीय रुग्णालयांमध्ये संदर्भित करण्यात आले आहे. ४२ हजार नागरिकांना हृदयविकार, मधुमेहसारखे आजार असल्याचे निदर्शनास आले आहे, तर ८५६ जणांना श्वसनविकार असल्याचे दिसून आले आहे.

सर्वेक्षणाचे काम दोन टप्प्यात पूर्ण करायचे आहे. पहिल्या टप्प्यातील सर्वेक्षण १५ ऑक्टोबपर्यंत तर दुसऱ्या टप्प्यातील सर्वेक्षण ३० ऑक्टोबपर्यंत पूर्ण केले जाणार आहे.  सर्वेक्षणाच्या कामासाठी १ हजार २४४ पथकांची आवश्यकता आहे. मात्र सध्या १ हजार १८९  पथकेच प्रत्यक्ष काम करत आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे सर्वेक्षणाच्या कामात अनेक अडचणी येत आहेत. शिक्षकांनी या कामात सहकार्य करण्यास नकार दिला आहे. काही ठिकाणी ग्रामपंचायती आणि नगर पालिकांकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. त्यामुळे या कामांसाठी कर्मचारी आणि स्वयंसेवक जमवाजमव करताना स्थानिक यंत्रणांना मोठी कसरत करावी लागत आहे. यामुळे सर्वेक्षणाचे काम धिम्या गतीने सुरू आहे.

माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमांतर्गत जिल्ह्यात घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. काही ठिकाणी मनुष्यबळ उपलब्ध नसल्याने अद्यापही सर्वेक्षण पथके पोहोचू शकलेली नाहीत. पण पुढील दोन ते तीन दिवसांत या ठिकाणी पथके पोहोचून सर्वेक्षणाचे काम पूर्ण केले जाईल. तसे निर्देश संबधित यंत्रणांना देण्यात आले आहेत.

– निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड