भाजपा प्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या कार्यकाळात मागच्या चारवर्षात १ कोटी २५ लाख घरे बांधण्यात आली आहेत असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी शिर्डीत बोलताना केला. याआधी सुद्धा प्रयत्न झाला. पण गरीबांना घर देऊन त्यांना सशक्त करण्याऐवजी एका कुटुंबाचा प्रचार करण्यावर जास्त भर होता.  वोट बँक तयार करण्याचा त्यामागे उद्देश होता असे मोदी म्हणाले. त्यांनी नाव न घेता काँग्रेसवर टीका केली.

आधीच्या सरकारच्या कार्यकाळात एक घर बनवायला सरासरी १८ महिने लागायचे. आज १२ महिन्यापेक्षा कमी वेळात घर बांधून पूर्ण होत आहेत. याआधीचे सरकार असते तर १ कोटी २५ लाख घरे बांधायला २० वर्ष लागली असती. म्हणजे तुमचे घराचे स्वप्न पूर्ण व्हायला २० वर्ष लागली असती असे मोदी म्हणाले.

घरामुळे जीवन सोपे होते आणि गरीबीविरोधात लढण्यासाठी बळ मिळते. २०२२ पर्यंत प्रत्येक बेघर व्यक्तिला घर देण्याचे आम्ही लक्ष्य समोर ठेवले आहे. त्यातील निम्मा मार्ग आम्ही पूर्ण केल्याचा आनंद आहे. आम्ही घराचे आकारमानही वाढवले आहे. घर बांधण्यासाठी मिळणारी ७० हजार रुपयांची सरकारी मदत वाढवून १ लाख २० हजार रुपये केली आहे असे मोदी म्हणाले.