सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे गुरुवारचे हे तिसरे पुष्प. या स्वरसोहळ्याची सुरुवात पं. संजीव चिमलगी यांच्या गायनाने झाली. पं. चिमलगी यांनी आपली ‘धन्य ते गायनी कला’ स्व. पं. माधव गुडी, तसेच पं. सी. आर. व्यास यांच्याकडून आत्मसात केली. पं. चिमलगी यांना स्वरसंवादिनीवर श्रीमती सीमा शिरोडकर तर तबल्यावर पं. विश्वनाथ शिरोडकर यांनी केली. श्रुतीवर सुचित्रा इनामदार व सृजन देशपांडे यांची साथ होती, तर स्वरसाथ नेहा गुरव यांची होती.
सर्वप्रथम आपल्या गायनाची सुरुवात त्यांनी ‘भीमपलास’ रागामधील बंदिशीने केली. ‘नंदिनी समुद्र अपरंपार’ या विलवाडय़ामधील पारंपरिक बंदिशीने सुरेख सुरुवात झाली. आवाजात जात्याच गोडवा, विविध अंगांनी केलेल्या आलापांच्या मांडणीने बंदिशीचे सौंदर्य अधिकच उठून दिसत होते. ढाल्या स्वराचा तबला आणि पं. विभव नागेशकरांची त्यांचेकडून आलेली सुस्पष्टता हे गायन खुलवित होते.
मध्य त्रिताल, तसेच द्रुत एकतालात ‘ये भवरे सताये’ या भीमपलाशीतील बंदिश खूप दाद देऊन गेल्या. यानंतर ‘भाग्यशा लक्ष्मी बारम्मा’ हे स्व. पं. भीमसेनजींचे अमर भजन भावपूर्ण स्वरांनी सादर केले. आपल्या गायनाचे समापन त्यांनी पं. कुमार गंधर्वानी रसिकांच्या हृदयात कोरलेल्या ‘गुरुजी.. एक निरंतर ध्यान जी’ या निर्गुणी भजनाने केले. हे भजन गुरुभक्तीचे पवित्र वातावरण संपूर्ण शामियान्यात पसरवून गेले. श्रीमद्भगवदगीतेमध्ये भगवंताने मह्टले आहे, ‘मी सर्वाना जाणतो, मला कुणीच ओळखत नाही’ या विश्वाच्या चालकालाच कुणी ओळखत नाही, ही व्यथा ज्यांना समजली तो पंथ म्हणजे हा निर्गुणी पंथ. परमात्म स्वरूप सद्गुरूखेरीज सर्व विश्वाचे ऐहिक सुख मृत्तिकेसमान मानणारा हा पंथ; त्यांचे हे त्यागवैभव त्यांच्या पारंपरिक काव्यातून तर भावलेच,पण समर्थ, प्रतिभावंत गायनामधून थेट हृदयास जाऊन भिडते.
असाच निरपेक्ष भाव ठेवणाऱ्या या स्वरमहोत्सवात गेली २०-२५ वर्षे सर्वच कलाकारांना साथ करणारा एक जैव तंबोरा आहे, की ज्याच्याशिवाय सर्व कलाकारांचे कलासादरीकरण अधुरे राहते! ते म्हणजे आपले सर्वाचे लाडके सूत्रसंचालक श्री. आनंद देशमुख. त्यांचे वयाचे हे ६२ वे वर्धापन वर्ष. बहुश्रुत असे व्यक्तिमत्त्व. सवाई गंधर्वाच्या कार्यक्रमातील पहिला श्रोता व साक्षी.त्यांच्या या निरलस, निरपेक्ष आणि उत्कृष्ट दर्जाच्या या अनोख्या कला सादरीकरणास सलाम! पुढील सांगीतिक कार्यासाठी शुभेच्छा!
यानंतर कलापिनी कोमकली, स्व. पं. कुमार गंधर्व यांच्या कन्या आणि शिष्या यांचे गायन झाले. अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कारप्राप्त, देश-विदेशात अनेक संगीत मैफिली गाजविलेल्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्व लाभलेल्या या विदुषी. कुमारजींप्रमाणेच सतत रागाचा विचार, मनन त्यांचे चालू असते.  पु. ल. देशपांडे यांच्याच शब्दात सांगायचे तर, ‘ही वसुंधरा मी सुंदर बनवीन’ अशी जिद्द या गायिकेची आहे. त्याचेच प्रतिबिंब त्यांच्या गायनावर पडते. भावनावेगामुळे आवाजात सतत चढ-उतार होत असतो, हे रोजच्या वागण्यात, बोलण्यात आपण पाहतो. गायन हे तर मानवी भावनांना वाट मोकळी करून देणारे सर्वश्रेष्ठ माध्यम आहे. मग इथेही हा चढ-उतार व्यासपीठावरील तथाकथित ‘मर्यादेचे संकेत’ ओलांडून सादर करण्याची त्यांची ही अनौपचारिक पद्धत खूप प्रशंसनीय तर आहेच; पण शास्त्रीय व नैसर्गिकही आहे.
 जसे वसंत ऋतूमध्ये पहाटे ५.३० वाजताही कोकीळ पक्षी केवढा गोड पण मोठय़ाने गातो, सर्व परिसर दणाणून सोडतो. जणू उच्च रवाने म्हणतो, ‘माझे जीवन गाणे गाणे.!’ या गुणी गायिकेने सर्वप्रथम राग ‘मुलतानी’ सादरीकरणासाठी निवडला. ‘बेबिया साईया’ ही विलंबित एकतालामधील गत गमक, खटक्या मुटक्या सरगमच्या तानांनी सुंदर पेश केली.
यानंतर ‘हमीर’ रागामध्ये सादर केलेली ‘अजब दुनिया जारिया कघरे’ ही त्रितालामधील बंदिश खूप गाजली,भावली! बंदिशीमधील स्वरांबरोबरच काव्याकडेही तितक्याच गांभीर्याने लक्ष देणारी, त्यामधील भावाचे रसग्रहण करणारी गायिका माझ्या पाहण्यात पहिलीच. राग हा सर्वागानेच बहरला, फुलला पाहिजे असे वाटत असेल तर रागाच्या बंदिशीमधील शब्दापासून सर्व बाबींचे अवधान ठेवलेच पाहिजे, अशी शिस्त क्वचितच पाहावयास मिळते. म्हणूनच सर्वार्थाने त्यांचे गायन श्रोत्यांच्या प्रथम पसंतीस उतरले. त्यांच्या खटक्याच्या ताना पंडितजींची ठायी ठायी आठवण करून देत होत्या. शेवटी ‘मांड’ रागामधील केहेरव्यात एक लोकधून सादर करून त्यांनी आपले गायन विक्रमी दाद घेऊन संपविले. कलापिनी यांच्या गायनाला साथसंगत अशी होती. तबला- संजय देशपांडे, स्वरसंवादिनीवर  सुयोग कुंडलकर, श्रुती- विनय चित्राव, प्रीति पंढरपूरकर.
यानंतर व्यासपीठावर एका अतिप्राचीन वाद्यासह  फारूख लतिफ खान आणि सरवार हुसेर या दोन तरुण कलाकारांचे आगमन झाले. वाद्य होते सारंगी. सारंगीचे खरे नाव आहे सौ-रंगी म्हणजे १०० रंग प्रसृत करण्याची क्षमता, किमया अंगी असणारे वाद्य. मानवी स्वराशी तादात्म्य पावणारे हे वाद्य, म्हणून ब्रिटिशपूर्व काळात सर्वच गायक साथीसाठी हे वाद्य वापरीत. स्वरांचा सूक्ष्मतम आविष्कार प्रसृत करणारे हे वाद्य आहे.
‘किराणा’ घराण्याचे संस्थापक आदरणीय उस्ताद अब्दुल करिम खाँ हे आधी उत्तम सारंगीये होते. नंतर गायक झाले. स्वरांची सूक्ष्मतम जाण यामुळेच त्यांच्या आवाजामध्ये होती. एक मोठे किराणा घराणे निर्माणाचा या वाद्याकडे सिंहाचा वाटा आहे.आज या वाद्याला सवाई गंधवार्ंच्या व्यासपीठावर आपले गायन सादर करण्याचे भाग्य लाभले. ‘श्री’ हा घनगंभीर राग प्रारंभ झाला. ‘सा रे् म प ध्’ स्वर वाजले. सारंगीच्या या खानदानी स्वरांनी कर्णसंपुटे तृप्त झाली. प्रत्येक आलाप, आजूबाजूच्या स्वरांची आस घेऊन येत होता. गमकाचा, खटक्याच्या तानांचा विशेष अभ्यास जाणवला. पं. रामदास पळसुले यांची तबला साथ उत्तम होती, तर पखवाजवरील अखिलेश गुंदेचा यांची साथ अभूतपूर्व. सारंगीच्या वादनास ती अतिशय पोषक ठरली. श्रुतीवर साथ मोहसिन मिरजकर यांची होती.
यानंतर पं. उल्हास कशाळकर यांचे पुत्र व शिष्य कु. समीहन कशाळकर स्वरमंचावर आपले गायन सादर करण्यासाठी आले. इतक्या लहान वयात देश-विदेशामध्ये अनेक सांगीतिक मैफिली यांनी गाजविल्या असून, अनेक मानाचे पुरस्कारही मिळवले आहेत. त्यांना साथ संगत- स्वरसंवादिनीवर- पं. श्री. अरविंद थत्ते, तर तबल्यावर तालयोगी पं. सुरेश तळवलकर, श्रुतीवर युवा गायक सचिन तेली तसेच सौरभ नाईक होते.
सर्वप्रथम त्यांनी राग ‘केदार’ सादरीकरणासाठी निवडला. तिलवाडा तालामध्ये ‘बन ठन कहाँ चली’ ही पारंपरिक बंदिश अतिशय सुंदर होती. आलापी आणि बोल ताना, तसेच गमक तानांचे, लयकारीचे अंग विशेषत्वाने जाणविले.
‘सुगर चतुर बैय्या तुम’ ही एकतालातील पारंपरिक बंदिशही उत्तम सादर केली. शेवट तराण्याने केला. विविध स्वरांवरून प्रारंभ व न्यास. तोच प्रकार तालाचा. प्रारंभ व सम अचूक गाठण्याचे कसब, यामुळे हे गाणे चैतन्य व उत्साहाने भरलेले होते.
पं. उल्हास कशाळकर यांचे स्वरमंचावर आगमन झाले. त्यांनी आज ‘बिहागडा’ हा राग सादरीकरणासाठी निवडला. पं. कशाळकरांनी आजवर अनेक संगीत सभा गाजविल्या. सध्या ते कलकत्ता येथे आयटीसी मध्ये जयपूर, ग्वाल्हेर घराण्याचे ‘गुरू’ म्हणून आहेत.सादरीकरणामधील विलंबित त्रितालामधील ही बंदिश सुरुवातीपासूनच रंगली. एक एक स्वरांनी केलेली बढत करण्याची कसब उत्तम. ‘प्यारे पग हो’ ही ती बंदिश. बोल आलापांनी, तसेच मिंड, गमकने रंगत होती. आकारयुक्त जबडातान, खडा आवाज याने गाणे भारदस्त झाले.
‘रेहेन दिना कैसे कटे’ त्रितालामधील या बंदिशीने ही संगीत सभा दणाणून सोडली. जोरकस आक्रमक तानांचा भरणा आणि आपल्या कलेवरची अविचल निष्ठा या गाण्याचे सौंदर्य वाढवित होते. यानंतर ‘सोहोनी’ रागामध्ये ‘देख बहे मन ललचाये’ ही बंदिश खूपच बेचैन करून गेली. हा उत्तरांग प्रधान आहे. तारसप्तकाच्या ताना दाखवणे तेही गायकास अत्यंत अवघड असते. पण हे आवाहन पंडितजींनी स्वीकारले व त्यात यशस्वीही झाले. पंडितजींच्या गायनाला साथ- स्वरसंवादिनी पं. अरविंद थत्ते, तर तबल्यावर पं. शरद तळवलकर होते. श्रुतीवर सचिन तेली, सौरभ नाईक हे कलाकार होते.
आपल्या कार्यक्रमाचे समापन ‘जमुनाके तीर’ या भावपूर्ण ठुमरीने केले. या करुण कातर स्वरांनी श्रोत्यांना वेगळ्याच भावावस्थेमध्ये पंडितजींनी नेऊन ठेवले.
अशा स्वरांच्या वातावरणात  तिसरे सत्र संपन्न झाले.