पुणे आणि लगतच्या परिसरात गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. काल रात्री शहरात झालेल्या पावसाने उच्चांक गाठला. रात्री 8 च्या दरम्यान सुरू झालेल्या पावसाने शहराला अक्षरशः झोडपून काढले. शहरात अतिवृष्टी होत असल्याने तसेच आपत्कालीन परिस्तिथी निर्माण झाली असल्याने पुणे जिह्यातील 5 तालुक्यांच्या शाळांना आणि महाविद्यालयांना आज सुट्टी जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केली आहे. एकीकडे नागरिकांना घरातून बाहेर पडणे देखील कठीण झालेले असताना धोधो कोसळणाऱ्या या पावसातही आपलं कर्तव्य चोख पार पाडणाऱ्या एका वाहतूक पोलिसाचा व्हिडीओ सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे.

मंगळवारी रात्रीचा हा व्हिडिओ असून, पुण्यातल्या येरवडा भागातील एका चौकात वाहतूक विभागाचे पोलीस कर्मचारी अशोक थोपटे ड्युटी बजावताना दिसत आहेत. येरवड्यातील सादलबाबा हा एक मोठा आणि वर्दळीचा चौक आहे. या ठिकाणी शहरातील विविध भागातून वाहने येत असतात. त्यामुळे दररोज मोठी वाहतूक कोंडी या ठिकाणी होत असते. मंगळवारी रात्री थोपटे हे मोठ्या चौकात वाहतूक नियमन करत होते. मुसळधार पावसामुळे समोरचे दिसणेही अवघड असताना थोपटे कसलीही तमा न बाळगता आपले कर्तव्य बजावत होते. त्यामुळे चौकातून जाणाऱ्या काही वाहनचालकांनी त्यांचे फोटो व व्हिडिओ काढले. त्यानंतर हे फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल व्हायला सुरूवात झाली. त्यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुण्याच्या पोलीस आयुक्तांनीही दखल घेतली. “रात्री सव्वादहाच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळत असतानाही त्यांनी आपली जागा सोडली नाही आणि कर्तव्य पार पाडलं…या पोलिसाच्या समर्पणाला माझा सलाम”, अशा आशयाचं ट्विट करत पुण्याचे पोलीस आयुक्त डी. वेंकटेशम यांनी अशोक थोपटे यांचं कौतुक केलं आहे.

तर, “रात्री ९ वाजताच ड्युटी संपली होती, पण, मुसळधार पावसामुळे एखादी गाडी खराब झाल्यास मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊ शकते याची मला कल्पना होती. वाहनचालकांची पावसामध्ये गैरसोय होऊ नये म्हणून रात्री ११ वाजेनंतर रस्ता मोकळा झाल्यावरच मी ड्युटी सोडली”, अशी प्रतिक्रिया थोपटे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली.

आणखी वाचा- सलाम! पुण्यात अग्निशमन दलाच्या जवानाकडून १० महिन्याच्या बाळाला जीवनदान

ज्या पावसात साधे उभे राहणे देखील अवघड होते, त्या पावसात कर्तव्य बजावणाऱ्या थोपटे यांच्या कर्तुत्वाचे आता नागरिकही कौतुक करत आहेत. अनेकदा आपण वाहतूक पोलिसांबाबात वाईट गोष्टी ऐकतो. त्यांच्यावर लाच घेण्याचेही आरोपही होतात. पण सगळेच काही असे नसतात. काही पोलीस आपल्या कर्तव्याला सर्वाधिक प्राधान्य देतात, म्हणूनच अशा पोलिसांचं सगळ्यांनी कौतुकही करायला हवं आणि आभारही मानायला हवेत.