पांगरा शिंदे ग्रामस्थांनी रात्र जागून काढली

हिगोली : वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथे रविवारी रात्री तीन वेळेस लागोपाठ जमिनीतून गूढ आवाज आला. आतापर्यंत ८० वेळा अशा प्रकारे गूढ आवाज आले असून त्यामुळे ग्रामस्थांची झोप उडाली आहे. असाच गूढ आवाज कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यातील काही गावातही आले आहेत. यामुळे कोणतीही हानी मात्र झाली नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.

पांगरा शिंदे येथे रविवारी रात्री १०.१३, १०.४२ व २.०५ असे तीन वेळेस आवाज झाले. हे आवाज पांगरा शिंदे गावासह वापटी, कुपटी, सिरळी, खापरखेडा आदी गावात आले आहेत. औंढा नागनाथ तालुक्यातील आमदरी तर कळमनुरी तालुक्यातील बोल्डा, असोला, म्हैसगव्हाण, हारवाडी या गावात जाणवल्याचे सुद्धा ग्रामस्थ सांगत आहेत. मागच्या काही दिवसांपासून जमिनीतून गूढ आवाज येण्याची मालिका सुरू आहे.

आतापर्यंत गावात ८० वेळेस हे आवाज आले आहेत. या आवाजाने ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागच्या आठवडय़ात जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाने येथे पथनाटय़ातून भूकंपाबाबत जनजागृती केली. मात्र या आवाजाचे गूढ काही अद्याप उकलले नाही. या आवाजाने ग्रामस्थातून भीतीचे वातावरण पसरले आहे. अनेकांनी रात्र जागून काढली आहे.

सरपंच भागवत शिंदे यांनी सांगितले की, गूढ आवाजाबाबत सांगितले की, जिल्हा प्रशासनाकडे सविस्तर माहिती दिली आहे. सतत येणाऱ्या या आवाजाचे गूढ कधी उकलणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.