News Flash

गणरायाच्या स्वागताची जय्यत तयारी

गेल्या पाचसहा दिवसांपासून जिल्ह्य़ात झालेल्या कमीअधिक स्वरूपाच्या पावसाने, तीव्र टंचाईची परिस्थिती बदलण्यास हातभार लावल्याने विघ्नहर्त्यां गणरायाच्या स्वागतास नगरकर सज्ज झाले आहेत.

| August 29, 2014 02:43 am

गेल्या पाचसहा दिवसांपासून जिल्ह्य़ात झालेल्या कमीअधिक स्वरूपाच्या पावसाने, तीव्र टंचाईची परिस्थिती बदलण्यास हातभार लावल्याने विघ्नहर्त्यां गणरायाच्या स्वागतास नगरकर सज्ज झाले आहेत. भाविकांनी घरोघरी आणि सार्वजनिक तरुण मंडळांनीही श्रीगणेशाच्या आगमनाची तयारी मोठय़ा जल्लोषात केली आहे. पूर्वसंध्येला वरुणराजाने विश्रांती घेतल्याने घरी प्रतिष्ठापना करावयाच्या श्रीमूर्ती श्रद्धेने सहकुटुंब, पारंपरिक पद्धतीने नेण्यात आल्या.
टंचाईच्या परिस्थितीतच गणरायाचे स्वागत करावे लागते का, अशी आशंका नगरकरांच्या मनात होती. ती गेल्या काही दिवस झालेल्या समाधानकारक पावसाने दूर झाली. मात्र उत्सवावर महागाईचे सावट आहेच. गणपती मूर्तीच्या किमतीत दरवर्षीच्या तुलनेत यंदा झालेली वाढ अधिक आहे. मूर्ती उत्पादनाचे शहर राज्यात मोठे केंद्र आहे. मूर्तीची कलात्मकता व आकर्षक रंगसंगती यामुळे राज्याबाहेरहूनही मागणी असते.
मूर्तीच्या प्रतिष्ठापनेसाठी सकाळी ११.५३ पर्यंत शुभकाळ असल्याचे पौरोहित्य करणाऱ्यांकडून सांगण्यात आले. मात्र शहरातील तरुण मंडळांमध्ये सायंकाळीच प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका काढण्याची परंपरा काही वर्षांपासून निर्माण झाली आहे. विसर्जन मिरवणुकीत सहभाग न घेणारी बहुसंख्य मंडळे प्रतिष्ठापनेच्या मिरवणुका जोरात काढतात. मरगळलेल्या बाजारपेठांना या उत्सवाने झळाळी मिळणार आहे.
शहरातील गांधी मैदान, माळीवाडा, चितळे रस्ता, दिल्ली गेट, प्रोफेसर कॉलनी चौक, भिंगार, भिस्तबाग नाका चौक या ठिकाणी मूर्ती विक्रीचे स्टॉल लागले होते, १५१ रुपयांपासून एक, दोन हजार रुपयांपर्यंत मूर्ती उपलब्ध आहेत. दगडुशेठ हलवाई, पद्मासनातील मूर्तीना घरातील प्रतिष्ठापनेसाठी प्राधान्य दिले जात होते. याच परिसरात पूजेचे व सजावटीच्या साहित्य विक्रेत्यांनी पथारी मांडल्या होत्या. गुलालाचे भाव व विविध रंगसंगतीही यंदा वाढले आहेत. सायंकाळी गर्दीमुळे या भागात वाहतूककोंडीचे अनुभव नागरिकांना मिळाले. पावसाने अनेक रस्ते खड्डेमय झाल्यानेही वाहतुकीची कोंडी होत होती.
 
– पोलिसांनी तरुण मंडळांच्या कर्णकर्कश डिजेवर बंदी केली आहे. बुधवारी झालेल्या शांतता समितीच्या सभेत याची माहिती देण्यात आली.
– माळीवाडा भागातील मानाच्या ११ मंडळांनी स्वयंस्फूर्तीने डिजेला मनाई केली आहे, सावेडीतील काही मंडळांनी त्याचे अनुकरण केले आहे.
– शहरातील तरुणांच्या काही गटांनी स्वतंत्रपणे ढोल-ताशांची पथके स्थापन केली आहेत, त्यांचे सराव काही दिवसांपासून सुरू होते, त्यांनाही चांगली मागणी आहे.
– तरुण मंडळांनी मंडपाच्या परिसरातील चौक सुशोभित केले आहेत. उद्यापासून ते दहा दिवस रोषणाईने उजळून जातील. काही मंडळांचा शनिवारपासूनच देखावे सुरू करण्याचा प्रयत्न आहे.
– सध्या सर्वच राजकीय पक्षांना विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत, निवडणूक सावटापासून उत्सावाचे पावित्र्य जपण्याचे कौशल्य मंडळाच्या कार्यकर्त्यांना करावे लागणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2014 2:43 am

Web Title: nagar ganeshotsav
Next Stories
1 राज्यस्तरीय नगरोत्थान योजना शिर्डीतील रस्त्यांसाठी २१ कोटी मंजूर
2 नगरला दोन इंच पाऊस
3 मुख्यमंत्र्यांच्या कोल्हापूर दौऱ्यात आश्वासनापेक्षा उपेक्षा वाटय़ाला
Just Now!
X