सिंधुदुर्गात चार पालिकांमध्ये शिवसेनेचे दोन नगराध्यक्ष

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील चार पालिका क्षेत्रातील निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेचे दोन व भाजपाचा थेट नगराध्यक्ष विजयी झाले. देवगड नगरपंचायतीत काँग्रेसचे दहा नगरसेवक विजयी झाल्याने तेथे काँग्रेसची सत्ता येईल. मात्र जिल्ह्य़ात चारही पालिकात काँग्रेसचे सर्वाधिक २९ नगरसेवक विजयी झाले आहेत. काँग्रेस नेते नारायण राणे यांना मालवण, वेंगुर्ले व सावंतवाडी नगरपरिषद नगराध्यक्ष निवडणुकीत धक्का बसला आहे. पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या होमपीचवर काँग्रेसचे आठ नगरसेवक विजयी झाल्याने केसरकर यांच्यावर राणे यांनी वचपा काढला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील सावंतवाडी, वेंगुर्ले, मालवण नगरपरिषद व देवगड नगरपंचायत निवडणूक मतमोजणी आज झाली. सावंतवाडीत शिवसेनेचा नगराध्यक्ष बबन साळगांवकर, वेंगुर्लेत भाजपाचा नगराध्यक्ष राजन गिरप तर मालवणमध्ये शिवसेना नगराध्यक्ष महेश कांदळगावकर विजयी झाले आहेत. देवगडात नगरसेवकातून नगराध्यक्ष ठरणार आहे. तेथे काँग्रेसने दहा जागांनी बहुमत मिळविले असल्याने काँग्रेसचा नगराध्यक्ष होईल. मात्र काँग्रेसला मालवण नगराध्यक्षपद काँग्रेस बंडखोर उमेदवारामुळे गमवावे लागले आहे.

जिल्ह्य़ात नगरपरिषद निवडणूकात काँग्रेसचे नगरसेवक २९, शिवसेनेचे दोन नगराध्यक्षासह १५ नगरसेवक, भाजपाने एक नगराध्यक्षासह १६ नगरसेवक तर राष्ट्रवादी तीन नगरसेवक विजयी झाले आहेत. जिल्ह्य़ात नगरपरिषद निवडणूकीत काँग्रेसने सर्वाधिक यश मिळविले आहे.

शिवसेना व भाजपाने सावंतवाडी आणि वेंगुर्ले नगरपरिषद निवडणूकीत स्वबळावर निवडणूक लढविली त्याचा फटका दोन्ही पक्षांना बसला. सावंतवाडीत सेनेचा नगराध्यक्ष तर वेंगुर्लेत भाजपाचा नगराध्यक्ष विजयी झाला. सावंतवाडीत शिवसेनेला ७ तर भाजपाला १ जागा मिळाली. या ठिकाणी सेना-भाजपाचा मतविभागणीचा फायदा काँग्रेसला मिळाला. काँग्रेस ८ जागांवर विजयी झाली व भाजपाची बंडखोर उमेदवार अन्नपूर्णा कोरगावकर विजयी झाल्या.

सावंतवाडीत पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या होमपीचवर काँग्रेसने आठ जागी विजय मिळविला आहे. मागील निवडणूकीत केसरकर यांनी राष्ट्रवादीचे १७ नगरसेवक विजयी केले होते. सध्या केसरकर शिवसेनेत आहेत. केसरकर रूपाने शिवसेनेची ताकद घटली. सेना-भाजपा युतीच्या मत विभागणीचा फायदा काँग्रेसला मिळाला.

पालकमंत्री दीपक केसरकर यांनी लोकसभा व विधानसभा निवडणूकीत नारायण राणे पीता-पुत्राचा पराभव करण्यासाठी दहशतीचा मुद्दा उपस्थित केला होता, पण यावेळी नारायण राणे यांनी केसरकर व भाजपाच्या निष्क्रीयतेवर प्रहार केला, तसेच गृहराज्यमंत्री केसरकर हवालदाराचीदेखील बदली करू शकत नाही असे म्हटले होते. त्यावर गृहराज्यमंत्री केसरकर यांनी राणेचा अजुनही अहंकार असेल तर तुरुंगात टाकू म्हटले होते. त्यामुळे या जुगलबंदीचा शिवसेनेला फटका बसल्याचे चित्र उभे राहीले आहे. गेली २५ वर्षे एक हाती नगरपरिषदेत वर्चस्व  राखणाऱ्या केसरकर यांच्या साम्राज्याला राणे यांनी धक्का दिला.

वेंगुर्ले नगरपरिषदेतदेखील शिवसेनेने  भाजपाशी युती टाळून पराभव पत्करला. केसरकर यांच्या मतदार संघातील सावंतवाडी व वेंगुर्ले नगरपरिषदेत शिवसेनेचा प्रभाव केसरकर राखू शकले नाहीत. वेंगुर्लेत भाजपाचा नगराध्यक्षासह सहा जागी विजय मिळविला तेथे शिवसेनेने एकच जागा मिळविली. या ठिकाणी काँग्रेस ७, अपक्ष २ व राष्ट्रवादी १ जागेवर विजय प्राप्त केला.

सावंतवाडी व वेंगुर्लेत पालकमंत्री दीपक केसरकर यांना काँग्रेस व भाजपाने जोरदार धक्का दिला, त्यामुळे निश्चितच आत्मपरिक्षण करण्याची तयारी पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दर्शवित जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत युती व्हावी म्हणून  प्रयत्न करू असे सांगत मतविभागणीचा फायदा काँग्रेसने घेतला आहे, असे त्यांनी सांगितले.

मालवण नगरपरिषद निवडणुकीत महेश कांदळगावकर ७११ मतानी विजयी झाले. शिवसेनेच्या कांदळगावकर यांनी काँग्रेसचे दीपक पाटकर यांचा पराभव केला. नारायण राणे यांनी काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न केला पण काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सुदेश आचरेकर यांच्यामुळे काँग्रेसला धक्का बसला. तेथे कांदळगावकर ४३३४, पाटकर ३६१३ व आचरेकर १७७९ मते मिळाली.

मालवणमध्ये भाजपा ५, शिवसेना ५, काँग्रेस ४, राष्ट्रवादी २ व अपक्ष १ विजयी झाले आहेत. शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार वैभव नाईक भाजपाशी युती केल्याने शिवसेना नगराध्यक्षासह सेना-भाजपा १० जागांवर विजयी झाली.

देवगड नगरपंचायत पहिलीच निवडणूक होती. काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी माजी आमदार अ‍ॅड. अजीत गोगटे, प्रमोद जठार व राष्ट्रवादीचे नंदू घाटे यांच्यावर टिकेची झोड उठवत गोगटे यांच्या गडाला धक्का दिला. या ठिकाणी नगरसेवकातून नगराध्यक्ष निवड होणार आहे.

देवगड-जामसंडेत काँग्रेस १०, भाजपा ४, राष्ट्रवादी १, शिवसेना १ अपक्ष १ असा कौल मतदारांनी दिला. या ठिकाणी काँग्रेसची सत्ता येईल. काँग्रेसने विजयानंतर अंडी फेकली म्हणून भाजपाने जोरदार निदर्शनेदेखील केली. त्यामुळे जिल्ह्य़ात देवगडमध्ये राणे व गोगटे यांच्यात परस्पर विरोधी टिका झाली.

या निवडणुकीत नारायण राणे, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या सत्ता संघर्षांला धक्का मिळाला तर काही प्रमाणात यशही मिळाले. सेना युती जेथे झाली तेथे फायदा तर युती झाली नाही तेथे नुकसानदेखील झाले.